लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : गेल्या वर्षी मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गाच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे सर्व मुले परीक्षाविना पास झाली. आता खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते पाचवी या वर्गासाठी विद्यार्थी शोध मोहीम सध्या जोरात सुरू असून, त्यामुळे शिक्षकांची या कोरोनातही दमछाक होताना दिसत आहे.
तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी म्हणजे मार्च २०२०पासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला. यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण निघाल्याने सर्वच ठिकाणी कडक लाॅकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे दुकाने, लग्न समारंभ, बस, बाजारसह सर्व काही बंद करण्यात आले होते. यात शाळा, महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आली होता. त्यामुळे गेल्या वर्षभरात तालुक्यातील जि.प.चे व खासगी शाळेचे ऑनलाइन क्लास सुरू होते. मात्र यात अनेक विद्यार्थ्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गाच्या परीक्षा रद्द करून थेट पास करण्यात आले. आता तालुक्यातील जि.प.च्या ३२२ प्राथमिक शाळा, तर सहा माध्यमिक शाळा आहेत, तर ११४ खासगी अशा एकूण ४४२ शाळा आहेत. या सर्व शाळेचे मिळून ६८ हजार विद्यार्थी आहेत. आता विद्यार्थी पास झाले असल्याने व जि.प.च्या व खासगी शाळेचे शिक्षक वर्ग पहिली व वर्ग पाचवीचे विद्यार्थी शोधण्यासाठी कोरोना परिस्थितीतही घराबाहेर पडून घरोघरी फिरत आहेत. कारण आपल्या शाळेला विद्यार्थी मिळाले पाहिजेत हाच उद्देश ठेवून सर्व शाळेचे शिक्षक हे फिरत असून काही शिक्षक हे पालकाला फोन लावून विचारणा करत आहेत. आपल्या शाळेत विद्यार्थी घेण्यासाठी संस्थाचालक व शिक्षक हे पालकांना आमिष म्हणून दफ्तर, बुट, पुस्तके शालेय गणवेश तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य भेट देण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र सध्या तालुक्यातील विविध शाळेत दिसत आहेत. विद्यार्थी शोधासाठी विविध शाळेचे शिक्षक हे दिवसभर विद्यार्थी शोध मोहिमेसाठी शहरात घरोघरी, ग्रामीण भागात, तांडे, वस्तीसह शेताच्या बांधापर्यंत जाऊ लागली आहेत.