केजमध्ये परराज्यातून आलेला गुटखा पकडला; २१ लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 05:47 PM2018-08-24T17:47:49+5:302018-08-24T17:49:27+5:30
परराज्यातून एका टेम्पोमध्ये आलेला गुटखा शहराजवळील एका जिनिंग जवळ गुरुवारी रात्री पोलिसांनी पकडला.
केज (बीड ) : परराज्यातून एका टेम्पोमध्ये आलेला गुटखा शहराजवळील एका जिनिंग जवळ गुरुवारी रात्री पोलिसांनी पकडला. पोलिसांनी कारवाई ट्रकसह २१ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना शहराजवळ उभ्या एका टेम्पोमध्ये (क्रमांक एम एच 04 एच एस 1086 ) परराज्यातून आणलेला गुटखा असल्याची गुप्त वार्ता मिळाली. यावरून पोलिसांनी गुरुवारी रात्री १० वाजता शहराजवळील एका जिनिंग समोर उभ्या असलेल्या टेम्पोस ताब्यात घेतले.
टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये १५ लाख रुपयाच्या गुटख्याची ४१ पोते आढळून आली. पोलिसांनी गुटखा व ट्रक असा २१ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. चालक शिवकुमार भगवंतलाल सरोज (रा. खटारा बजार, उत्तर प्रदेश) व वाहक महेंद्र रमेश गिरी ( रा. महादेवा पोस्ट डिग उत्तर प्रदेश ) या दोघांनावर पुढील कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले, पोलीस काॅन्सटेबल एस. डी. राठोड, एस. डी. अंहकारे, जे. ए. शेख, डी. बी. रहाडे, एच. जी. इंगोले, व्ही. व्ही. राऊत यांनी केली.