कोंडीत घुसमटले बीड शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:10 AM2018-05-15T01:10:32+5:302018-05-15T01:10:32+5:30
बीड शहरातील वाहतूक व्यवस्था मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बीडकर त्रस्त आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही वाहतूक पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील वाहतूक व्यवस्था मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बीडकर त्रस्त आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही वाहतूक पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांच्याकडून सुरळीत वाहतूक करण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याचे समोर आले आहे. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच आज बीड शहरात नियमांचे उल्लंघन करुन वाहने सुसाट पळविणाऱ्यांसह अवैध प्रवासी वाहतूक करणा-यांचा सुळसुळाट वाढला आहे.
नुकतेच रस्ता सुरक्षा अभियान पार पडले. वाहतूक शाखा, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. वास्तविक पाहता आरटीओ कार्यालयाने केवळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यानंतर मात्र ते गायब झाले. वाहतूक शाखेच्या वतीने आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. परंतु हे सर्व कार्यक्रम केवळ आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे झाले. त्यामध्ये उत्साह दिसून आला नाही. हे अभियान केवळ करायचे म्हणून करायचे असाच काहीसा निष्कर्ष यातून नागरिकांना पहावयास मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून वाहनधारकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती. परंतु या अभियानाचे उद्घाटन आणि समारोपच नागरिकांना समजला. आठ दिवस काय कार्यक्रम झाले, किती प्रबोधन झाले, कोणी लाभ घेतला हे मात्र केवळ कागदावरच राहिले.
याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक के.पी.काळे म्हणाले, शहरातील सिग्नल सुरू करण्यासाठी नगर पालिकेला पत्र दिलेले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पॉर्इंट निश्चत करून त्याठिकाणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. वाहनधारकांनीही पोलिसांना सहकार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.
कायमस्वरुपी अधिकारी मिळेना
पो. नि. घनश्याम पाळवदे यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाल्यानंतर दिनेश आहेर यांच्याकडे काही दिवस वाहतूक शाखा सोपविण्यात आली. त्यानंतर त्यांची गेवराई ठाण्यात बदली झाली. गेवराई ठाण्याचे पोनि सुरेश बुधवंत यांच्याकडे वाहतूक शाखा देण्यात आली. परंतु बुधवंत यांच्याकडे पुन्हा पोलीस कल्याण व इतर कारभार देण्यात आला. त्यामुळे त्यांचे वाहतूक शाखेकडे दुर्लक्ष झाले. त्यातच आता आठवडाभरापासून ते सुटीवर आहेत. सध्या पो. उपनि. एस. काळे यांच्याकडे वाहतूक शाखेचा पदभार आहे. वारंवार अधिकारी बदलत असल्यामुळे वाहतूक शाखेचीच ‘कोंडी’ होत आहे. कायमस्वरुपी अधिकारीच मिळत नसल्याने ही समस्या उद्भवल्याचे बोलले जात आहे.
अपु-या कर्मचा-यांमुळे समस्यांमध्ये वाढ
बीड शहर वाहतूक शाखेकडे कर्मचारीही अपुरे आहेत. सध्या ३६ कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. पैकी रजा, साप्ताहिक सुटी व इतर कारणांमुळे ८ ते १० जण सुटीवर असतात. त्यामुळे २० ते २५ कर्मचाºयांवरच शहरातील वाहतुकीचा डोलारा आहे. अपुरे कर्मचारी असतानाच व्हीआयपींचा बंदोबस्तही त्यांना करावा लागतो. शिवाय, कारवायांचे ‘टार्गेट’ही पूर्ण करावयाचे असते. हे सर्व करताना वाहतूक पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत.
बैठकांवर बैठका झाल्या, पण उपयोग काहीच नाही
सुभाष रोडवरील वाहतुकीची समस्या लक्षात घेता उप अधीक्षक खिरडकर यांनी या भागातील व्यापाºयांची बैठक घेतली. नाल्यांवर पत्रा टाकून व समोर पांढरे पट्टे ओढून पार्किंगची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. १० मे पर्यंत त्यांना मुदत दिली होती. परंतु याची कोठेच अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले नाही. आजही पूर्वीसारखीच जैसे थे परिस्थिती पाहवयास मिळत आहे. उप अधीक्षकांकडच्या बैठकीचा व्यापाºयांवर काहीच परिणाम नसल्याचे दिसून येते. आता पोलिसांकडून काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
बायपासमुळे त्रास कमी
बीड शहराला नवीन बायपास झाल्यामुळे अवजड वाहने शहराबाहेरुन जातात. त्यामुळे काही प्रमाणात बीडकरांचा त्रास कमी झाला आहे. परंतु वाहतूक पोलिसांनी जबाबदारीने काम केल्यास वाहनधारकांचा त्रास पूर्णपणे कमी झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु वाहतूक पोलीस प्राधान्याने काम करीत नसल्याचे दिसून येत आहे.
नियमांचे उल्लंघन नको
बीड शहरात वाहतूक पोलिसांकडून कारवाया केल्या जात असल्या तरी वाहनधारकांनीही आपली जबाबदारी ओळखून काळजी घेण्याची गरज आहे. नियमांचे उल्लंघन करू नये.