क्या बात है! कुणी जमीन घेतली, कुणी बंगला बांधला; गावातील तरुणाई ब्लॉगमधून कमावतेय 'डॉलर'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 01:52 PM2023-03-27T13:52:42+5:302023-03-27T13:53:28+5:30
या तरुणांनी गावाला ‘ग्लोबल व्हिलेज’ बनवून गावाचे नाव देशपातळीवर नेण्याचा मानस व्यक्त केला आहे.
- अनिल लगड/रामकिसन तळेकर
बीड : गुगलवरील ब्लॉग व युट्यूब चॅनलच्या जोरावर चार हजार लोकसंख्या असलेल्या कोळगावच्या बारावी ते पदवीधर तरुण एकत्र येऊन महिन्याला हजारो डॉलरची कमाई करीत आहेत. या कमाईतून या मुलांनी जमीन, बंगले, आयफोन, स्पोर्ट बाइक खरेदी करून आपल्या कुटुंबाची प्रगती साधली आहे. एवढेच नव्हे, या तरुणांनी गावाला ‘ग्लोबल व्हिलेज’ बनवून गावाचे नाव देशपातळीवर नेण्याचा मानस व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कोळगाव हे माजलगाव-अहमदनगर महामार्गावरील साडेचार हजार लोकवस्तीचे गाव. संपूर्ण कोरडवाहू शेती. दुष्काळी स्थिती असल्याने, येथील अनेक कुटुंबे ऊसतोडणी किंवा पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे रोजगारासाठी जातात, परंतु आता येथील अनेक तरुण उच्चशिक्षित झाले आहेत. असं म्हणतात की, आजचा तरुण मोबाइलच्या आहारी जाऊन दिशाहीन बनला आहे, असा आरोप होत आहे, परंतु ५०० रुपयांच्या मोबाइल डेटाच्या गुंतवणुकीत महिन्याला लाखो रुपयांची कमाई करता येते, हे कोळगाव येथील दहा-बारा तरुणांनी दाखवून दिले आहे.
येथील अक्षय सुदामराव रासकर (वय ३४) या कॉम्प्युटरचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने सांगितले की, २००९ मध्ये मी माही ग्रुप अँड कंपनी स्थापन केली. यातून युट्यूब चॅनल सुरू केले. यामुळे गुगल सर्चमध्ये ब्लॉगिंगचा प्रकार माहिती झाला. यातूनही पैसा कमावता येऊ शकतो, हे कळाले. यामुळे टेक्निकल सपोर्ट नावाने युट्यूब चॅनल सुरू केले. युट्यूबवर शेतकऱ्यांशी संबंधित शासकीय योजनांची माहिती, कर्जाबाबत माहिती, शेतीमालाचे बाजारभाव, शेतीविषयक तंत्रज्ञान व इतर जुगाड यंत्र, ऑनलाइन अर्जांची माहिती असे अपडेट देणे सुरू केले. त्यास प्रतिसाद मिळत गेला. यातून मला सुरुवातीला २२२ डॉलर महिन्याला मिळू लागले, परंतु ही कमाई समाधानकारक वाटली नाही, म्हणून आपण काही तरुणांना एकत्र करून ग्रुप बनविला, तर आणखी यातून कमाई होऊ शकते, असा विचार मनात आला.
यातून मग सुरुवातीला गावातील १०-१२ तरुणांना एकत्र करून कंपनीच्या ग्रुपला जोडून घेतले. यातून चांगला रिझल्ट मिळाला. मग येथूनच आमच्या ब्लॉगची दुनिया सुरू झाली. आता गावातील तरुणांसह गेवराई, बीड येथील १७-१८ तरुण यात काम करीत आहेत. आमच्या साइटला गुगलला येणाऱ्या जाहिरातीमधून आम्हाला गुगलकडून उत्पन्न मिळत आहे. आमच्या ब्लॉगची माहिती लिंकद्वारा चांगली शेअर होत असल्याने चांगले व्ह्यूज मिळत आहेत. यातून सध्या आम्हाला ३५ ते ४० हजार डॉलर म्हणजेच ३० ते ३५ लाख रुपये महिन्याला यातून मिळत आहेत. यातील मी मला ६० टक्के व तरुणांना ४० टक्के असे प्रमाण देतो. यातून तरुणांना त्यांच्या कामानुसार महिन्याला ५० हजार रुपयांपासून २ लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.
अनेकांनी आर्थिक प्रगती साधली
बारावीपासून ते इंजिनीअरिंगची पदवी घेतलेले तरुणही आहेत. त्यांनी या कमाईच्या माध्यमातून कुणी बंगला बांधला, कोणी जमीन घेतली, बाइक, चारचाकी वाहन, लॅपटॉप, आयफोन खरेदी करून कुटुंबाची आर्थिक प्रगती साधली आहे.
- अक्षय रासकर
स्वतःच्या कमाईतून घर बांधले
मी बारावी पास आहे. मला गावातच यातून रोजगार मिळाला आहे. माझी पूर्वी परिस्थिती हलाखीची होती. मला यातून १ लाख रुपयांच्या आसपास दरमहा कमाई होते. यातून मी घर बांधले आहे. एक बाइकही खरेदी केली असून, पुढे गेवराईला बीएससी, बीसीएसचे शिक्षण घेत आहे.
- सौरभ लोंढे
गावात जमीन खरेदी केली
मी बीसीएस (आयटी) करीत आहेत. यातून मला २ लाखांची दरमहा कमाई होत आहे. ब्लॉगिंगच्या कमाईतून अर्धा एकर जमीन गावातच खरेदी केली आहे. घर बांधले आहे. मी येथे विविध विषयांवर कंटेन्ट लिहून देण्याचे काम करतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा मानस आहे.
- आदित्य पाटील
६० हजार महिना पडतो
मी सध्या बीए करीत आहे. वेबसाइटवर आम्ही तयार केलेले विषय पोस्ट करण्याचे काम करतो. यासाठी संचालक अक्षय रासकर यांचे मार्गदर्शन मिळते. मला घर नव्हते. मी सध्या घर बांधले आहे. यातून मला दरमहा ५० ते ६० हजारांची कमाई होते.
- ऋषिकेश हिंदोळे
कामात समाधानी आहे
मी पुणे येथे बी.ई. केमिकलची पदवी घेतली आहे. मला यातून दीड ते दोन लाख रुपये महिन्याला कमाई मिळते. मी येथे शासनाच्या योजना, शेती तंत्रज्ञानाची माहिती संकलनाचे काम करीत आहे. मी या कामात समाधानी आहे.
- अभिजीत रासकर