माजलगाव : गोष्ट सांगणे आणि गोष्ट ऐकणे हा मानवाचा स्थायीभाव असून भारतात कथेची फार मोठी परंपरा आहे. जीवनातील छोट्या-छोट्या घटनांतून विनोद निर्मिती व कथा निर्मिती होत असते. जीवनात आनंद मिळवण्यासाठी आपण कथा-कविता लिहिल्या पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध ग्रामीण कथाकार रामदीप डाके यांनी केले.
येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री सिद्धेश्वर महाविद्यालयातील मराठी विभागाने आयोजित केलेल्या कथाकथन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना हे उपस्थित होते. डाके म्हणाले, आज लोक संकुचित होत आहेत. समाजजीवनात वैफल्य निर्माण होत आहे. प्रत्येक जण आपला आनंद हरवून बसला आहे. ताणतणावामध्ये जीवन जगणाऱ्या माणसाने साहित्याला जवळ केले पाहिजे. आनंदी जीवन जगण्यासाठी आपण ज्ञानेश्वर, रस्किन, इलियट, प्रेमचंद, शेक्सपियर, तुकाराम यांच्या साहित्याचा आस्वाद घेऊन निसर्गाबरोबर मैत्री केली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी रामदीप डाके यांनी कथेचे तंत्र आणि मंत्र सांगून ‘सीतेचा वनवास’ ही ग्रामीण विनोदी कथा सादर करून विद्यार्थ्यांना तासभर खळखळून हसवले. उपप्राचार्य डॉ. होन्ना यांनी रा.रं. बोराडे, शंकर पाटील, आनंद यादव, द.मा. मिरासदार यांचे कथा साहित्य समृद्ध आहे. त्याचा आपण आस्वाद घेतला पाहिजे, असे सांगितले. महाविद्यालयातील विद्यार्थी लिहिते व्हावे म्हणून असे कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरतात, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. रमेश गटकळ यांनी केले. तर, सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर गवते यांनी केले. साक्षी मोगरकर हिने आभार मानले. यावेळी उपप्राचार्य प्रा. युवराज मुळये, प्रा. संतोष लिंबकर व महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.