मुंबई सोडून आला अन् शेतीत रमला; टरबूज लागवडीतून अखिल पटेल झाला लखपती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 07:47 AM2023-03-27T07:47:25+5:302023-03-27T07:47:34+5:30

दिंद्रुड येथील अखिल पटेल यांचा मुंबईमध्ये मीठ व्यवसाय होता. वर्षाकाठी १० ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न या व्यवसायातून त्यांना मिळायचे.

Left Bombay and took up agriculture; Akhil Patel became a millionaire from watermelon cultivation | मुंबई सोडून आला अन् शेतीत रमला; टरबूज लागवडीतून अखिल पटेल झाला लखपती

मुंबई सोडून आला अन् शेतीत रमला; टरबूज लागवडीतून अखिल पटेल झाला लखपती

googlenewsNext

- संतोष स्वामी 

दिंद्रुड (जि. बीड) : पैसे कमविण्यासाठी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे युवकांचा कल असतो. शहरी भागात विविध मार्गातून पैसे कमवायच्या संधी असतात. मात्र दिंद्रुड येथील एक तरुण मुंबईचा चालू व्यवसाय बंद करून गावी शेती सांभाळण्यासाठी परतला आणि इथेच रमला. टरबुजाची आधुनिक शेती करीत या शेतकऱ्याने केवळ तीन महिन्यात चार लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

दिंद्रुड येथील अखिल पटेल यांचा मुंबईमध्ये मीठ व्यवसाय होता. वर्षाकाठी १० ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न या व्यवसायातून त्यांना मिळायचे. मात्र गावाची व शेतीची ओढ त्यांना दिंद्रुडात परत घेऊन आली. दिंद्रुड येथील काजीबा देवस्थानची तीन एकर इनामी जमिनीची देखरेख अखिल करतात. पारंपरिक शेतीला छेद देत अभिनव पद्धतीने टरबूज या नगदी पिकाची लागवड त्यांनी गतवर्षीपासून सुरू केली. 
१० जानेवारीला लावलेल्या टरबुजाच्या रोपट्यांनी आता अखिल यांना लखपती केले आहे. जवळपास दोन लाख रुपये खर्च करून जोपासलेल्या या टरबूज शेतीत पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.  

दोन लाख खर्च, साडेचार लाख कमाई 

अखिल पटेल यांनी पावणे तीन एकर शेती नीटनेटकी करून मल्चिंग, ठिबक, सेंद्रिय खते त्याचप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर करीत टरबूज शेती जोपासली. एकूण २ लाख रुपये त्यासाठी खर्च केले. १० जानेवारीला रोपे लावली. २० मार्चला पहिली तोड करण्यात आली. या पिकातून साडेचार लाखांची कमाई आतापर्यंत झाली असून आणखी दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळेल.

कोलकाता, सुरतला गेले टरबूज 

माल दलालामार्फत कोलकाता व सुरत शहरात विक्रीसाठी पाठवला गेला आहे. होलसेल दरात ८ ते १० रुपये प्रति किलो भाव मिळाला असून ६० टन टरबुजाचे उत्पन्न दोन महिन्यात शेख अखिल पटेल यांना मिळाले आहे. 

Web Title: Left Bombay and took up agriculture; Akhil Patel became a millionaire from watermelon cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.