लिंबू झाले महाग, तैवानच्या लिंबूसत्त्वाने सरबत झाले थंडा थंडा कूल कूल
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 23, 2024 05:11 PM2024-05-23T17:11:25+5:302024-05-23T17:12:46+5:30
उन्हाळ्यात सरबत व शीतपेयांमध्ये लिंबू सत्त्वाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने ‘मार्च ते मे’ या तीन महिन्यांत लिंबू सत्त्वाची विक्री वाढते.
छत्रपती संभाजीनगर : मध्यंतरी लिंबू महाग झाल्याने सरबत विक्रेत्यांनी तैवान देशातून आणण्यात आलेल्या सायट्रिक ॲसिडचा वापर करून सरबत तयार करीत आहेत. आपणही रस्त्यावर सायट्रिक ॲसिडपासून बनविलेले लिंबू सरबत प्यायले असेल. ‘थंडा थंडा कूल कूल’ हे सायट्रिक ॲसिड म्हणजे ‘लिंबू सत्त्व’ होय.
सायट्रिक ॲसिड
‘सायट्रिक’ हा शब्द लॅटिन शब्द ‘सिट्रॉन’वरून आला आहे. ज्याचा अर्थ लिंबासारखे मोठे, सुवासिक लिंबूवर्गीय फळ, असा होतो. त्यास आपल्याकडे ‘लिंबू सत्त्व’ असे म्हणतात. यापासून शरीराला काही अपाय होत नाही.
लिंबू महागल्यावर त्यावर पर्याय
मध्यंतरी लिंबाचे भाव २०० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यावेळेस सरबत बनविणारे १२० रुपये किलोच्या ‘लिंबू सत्त्व’चा वापर करीत होते. अजूनही अनेक सरबत विक्रेते याचाच वापर करतात. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस यामुळे सरबताची विक्री कमी झाली आहे. याचा परिणाम लिंबाच्या किमतीवर झाला. सध्या भाजी मंडईत लिंबूही १२० रुपये किलोने मिळत आहे.
सायट्रिक ॲसिडचा शोध कोणी लावला?
लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक ॲसिड हे आम्ल आढळून येते. लिंबू, संत्री, मोसंबी इ. फळात सायट्रिक ॲसिड आढळून येते. त्याची चव आंबट असते. इंग्लंडमधील कार्ल्स शील्स यांनी १८७४ मध्ये लिंबाच्या रसात सायट्रिक
ॲसिडचा शोध लावला.
प्रत्येक स्वयंपाकघरात असते लिंबू सत्त्व
किराणा दुकानात ५० ग्रॅम लिंबू सत्त्व १० रुपयांना मिळते. अनेक पदार्थांमध्ये लिंबू सत्त्वाचा वापर केला जातो. विशेषत: ढोकळा बनविण्यासाठी लिंबू सत्त्वच वापरले जाते.
दर महिन्याला २ टन लिंबू सत्त्वाची विक्री
हॉटेललाइनमध्ये लिंबू सत्त्वाचा जास्त वापर होतो. उन्हाळ्यात सरबत व शीतपेयांमध्ये लिंबू सत्त्वाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने ‘मार्च ते मे’ या तीन महिन्यांत लिंबू सत्त्वाची विक्री वाढते. या हंगामात दर महिन्याला २ टन लिंबू सत्त्वाची विक्री होते. एरव्ही पावसाळ्यात व हिवाळ्यात केवळ ३०० ते ५०० क्विंटलच लिंबू सत्त्व विकले जाते, असे ठोक व्यापाऱ्यांनी सांगितले.