माजलगावात मंदीराच्या कळसावर विज कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 06:01 PM2018-06-05T18:01:38+5:302018-06-05T18:01:38+5:30
नागडगाव येथील हनुमान मंदीराच्या कळसावर आज पहाटे सुरु झालेल्या मुसळधार पावसात विज कोसळली.
माजलगाव (बीड ) : तालुक्यातील नागडगाव येथील हनुमान मंदीराच्या कळसावर आज पहाटे सुरु झालेल्या मुसळधार पावसात विज कोसळली. यामुळे कळसाला तडे गेले असून त्यावरील उपदेवतांच्या अनेक मूर्ती भंग पावल्या.
नागडगाव येथे तीन वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून हनुमान मंदिर उभारण्यात आले आहे. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास तालुक्यात जोरदार पाऊस सुरु झाला. विजेच्या कडकडाटासह सुरु झालेल्या या पावसात गावाच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराच्या कळसावर मोठ्या आवाजासह विज कोसळली. यामुळे कळसाला तडे गेले असून तेथील आठ ते दहा मूर्ती भंग पावल्या आहेत.
या दरम्यान, वीज कोसळताना झालेल्या मोठ्या आवाजाने गावकरी भयभीत होऊन घराबाहेर पळाले. माञ, गावात वीज नसल्याने यावेळी नेमका प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला नाही. सकाळी काही गावकरी दर्शनासाठी मंदिरात आले यावेळी त्यांना मंदिराच्या कळसाला तडे गेल्याचे आढळून आले. काही गावकऱ्यांनी कळसावर जाऊन पाहणी केली असता तेथे अनेक ठिकाणी तडे गेले असल्याचे दिसून आले. तसेच तेथील काही मूर्ती भंग पावल्याचे दिसले. मंदिराच्या केवळ शिखरास तडे गेले असून बाकी मंदिर सुरक्षित असल्याची माहिती सुनील सोळंके , बळीराम सोळंके या गावकऱ्यांनी दिली आहे.