लॉकडाऊनला विरोध वाढतोय; धारूरमध्ये व्यापारी शिथिल काळात पाळणार बेमुदत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:26 PM2021-03-26T12:26:32+5:302021-03-26T12:28:20+5:30
Lockdown In Beed : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान लॉकडाऊन लागू केला आहे.
धारूर : बीड जिल्ह्यातील संपूर्ण लॉकडाऊनच्या निर्णयास येथील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ सकाळी ७ ते ९ या शिथिलता वेळेत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. जर निर्णयात बदल झाला नाही तर हा बंद पुढेही सुरूच राहील असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान लॉकडाऊन लागू केला आहे. या निर्णयामुळे व्यापारी, भाजीपाला उत्पादक, शेतकरी, सर्वसामान्यांचे कंबरडे मोडेल यामुळे कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने निर्बंध कडक करावेत मात्र संपूर्ण लॉकडाऊन करू नये अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. परंतु, प्रशासनाने मागणीचा विचार न करता जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. याच्या निषेधार्थ सकाळी ७ ते ९ या शिथिलता वेळेत व्यापाऱ्यांनी बेमूदत बंदचा निर्णय घेतला आहे. यानुसार आज सकाळी व्यापाऱ्यांनी बंद पाळून शासनाच्या धोरणाला विरोध दर्शला. हा बंद बेमूदत पाळण्यात येणार असलायचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी सांगितले.