बीड - राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे मराठवाड्यात लॉकडाऊन करण्यास सुरुवात झाली आहे. नांदेडनंतर आता बीड जिल्ह्यातही 10 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात कलम 144 अनुसार लॉकडाऊनचे आदेश लागू करण्यात येत आहेत. 26 मार्च 00.00 ते 4 मार्च 24.00 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. बीड नगरपालिका शहर, ग्रामीण भागातही हा आदेश लागू राहणार असल्याचं या पत्रात म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर ज्याप्रमाणे सर्वच बंद करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे बीड जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात सर्वकाही बंद राहणार आहे. तसेच, जिल्ह्यातील वाहतूक सेवाही बंद राहणार असून पूर्व परवानगीनेच अत्यावश्यक सेवांसाठी ही वाहतूक सुरू राहिल, असे या आदेशात म्हटले आहे. किराणा दुकानांच्या ठोक विक्रेत्यांना सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत दुकान उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यावेळीही, सामाजिक अंतर आणि मास्क बंधनकारक असणार आहे. दूधविक्री सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहिल. भाजीपाला आणि फळांची विक्रीही सकाळी 7 ते 10 या वेळतच करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन औषध वितरण आणि रुग्णालयाशी संबधित सेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मिशन बिगेन अगेननंतर पहिल्यांदाच 10 दिवसांचा लॉकडाऊन बीड जिल्ह्यात करण्यात आला आहे.