बीड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावरून व्हायरल करणाऱ्यांवर बीड पोलिसांनी कारवायांचा बडगा उगारला आहे. अवघ्या १२ तासांत १० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून आणखी ५० च्यावर लोकांची यादी तयार केली असून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांत वाद झाला होता. या घटनेत अनेकांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्या. तसेच शुक्रवारी केज तालुक्यातील धर्माळा येथे लोकसभा निवडणुक उमेदवाराच्या पत्नीवर कोयत्याने हल्ला झाल्याची खोटी अफवा पसरवली. याचे पडसाद जिल्ह्यात उमटले. सोशल मिडीयावरून टिका व अपशब्द वापरून खालच्या स्तराचे राजकारण झाले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाच धागा पकडून पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सोशल मिडीयावर अफवा पसरविणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सायबर सेलमध्ये विशेष विभाग स्थापन केला. ७०३०००८१०० या क्रमांकावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यासंदर्भात आवाहन केले. नाव गोपनिय ठेवण्याचा विश्वास दिला. त्यामुळे अवघ्या १२ तासांत तक्रारींचा ढिगारा साचला. अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक रोशन पंडित स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी आलेल्या तक्रारींची शहानिशा केली. पोस्ट टाकणाऱ्यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मिळविले. या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या.
पत्ता आणि संपर्क करताना दमछाकसोशल मिडीयावर पोस्ट टाकल्याचे दिसून येते. मात्र संबंधिताचा शोध घेऊन त्याच्याशी संपर्क करताना पोलिसांना कसरत करावी लागत आहे. विशेष टिम यासाठी काम करू लागली आहे. संपर्क करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत.
खोट्या बातम्या छापणाऱ्यांवरही नजरधर्माळा येथील घटनेत उमेदवाराच्या पत्नीवर कोयत्याने हल्ला झाल्याच्या बातम्या अनेकांनी प्रसिद्ध केल्या. मात्र हा वाद वैयक्तिक कारणावरून झाला असून यात कसलेही राजकीय कारण नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. अनेक माध्यमांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे वृत्त प्रकाशित केले. त्यांनाही पोलीस व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नोटीस पाठविली जाणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते.
प्रतिबंधात्मक कारवाई सुरु आहे सोशल मिडीयावरून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्या पोस्टची खात्री करून प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. नागरिकांनी आणि माध्यमांनी खोट्या बातम्या व अफवा पसरवू नयेत. बीड पोलिसांना सहकार्य करावे.- विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, बीड