रिवार्डच्या आमिषाने भामट्याला दिला मोबाईलचा ताबा; काही वेळातच लागला ५९ हजारांचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 06:45 PM2021-03-10T18:45:47+5:302021-03-10T18:47:00+5:30
cyber crime ॲपच्या सहाय्याने त्यांच्या मोबाईलचा ताबा घेत भामट्याने विविध व्यवहारातून प्रसाद यांच्या खात्यातून एकूण ५८ हजार ९९९ रुपये काढून घेतले.
अंबाजोगाई : अत्याधुनिक पद्धतींच्या सहाय्याने दिवसेंदिवस भामटे वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून बँक ग्राहकांचे पैसे लुबाडण्याच्या घटना वाढत आहेत. बँक, पोलीस यांच्याकडून वारंवार काळजी घेण्याबाबत बजावूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून आर्थिक नुकसानीला बळी पडत आहेत. अशीच आणखी एक घटना अंबाजोगाई तालुक्यात उघडकीस आली आहे. रिमोट ॲपचा वापरकरून एका अभियंत्याच्या बँक खात्यातून ५९ हजार रुपये काढून घेण्यात आले.
प्रसाद रमेश शिंदे (रा. हिवरा बु., ता. माजलगाव) असे फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. ते अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी येथील एका बांधकाम कंपनीत कामाला आहेत. गुरुवारी (दि.०४) दुपारी कामावर असताना त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. समोरून बोलणाऱ्या भामट्याने सांगितल्यानुसार फोन पे ॲप मधील रिवार्ड जमा करत असताना प्रसाद यांच्या खात्यातून ४ हजार ९९९ रुपये त्या भामट्याच्या खात्यावर गेले. ते परत देण्याच्या बहाण्याने भामट्याने त्यांना मोबाईलवर ‘एनी डेस्क’ नावाचे रिमोट कंट्रोल ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
ॲपच्या सहाय्याने त्यांच्या मोबाईलचा ताबा घेत भामट्याने विविध व्यवहारातून प्रसाद यांच्या खात्यातून एकूण ५८ हजार ९९९ रुपये काढून घेतले. सदर प्रकार लक्षात येताच प्रसाद यांनी तातडीने उर्वरित रक्कम स्वतःच्या दुसऱ्या खात्यात जमा केली आणि बँकेला सूचित करून खाते आणि एटीएम कार्ड ब्लॉक केले. प्रसाद शिंदे यांचं फिर्यादीवरून अज्ञात भामट्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.