Maharashtra Election 2019: मुंडे भाऊ-बहिणीतील कलह पोहोचला पोलीस ठाण्यापर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 05:07 AM2019-10-22T05:07:37+5:302019-10-22T06:33:44+5:30
Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकीत परळीतील राजकारण नव्या वळणावर
- सतीश जोशी
बीड : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे या भाऊ बहिणीतील राजकीय संघर्ष या विधानसभा निवडणुकीत पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तर मर्यादांचे सर्व संकेत तोडले गेल्याचे चित्र दिसले.दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा म्हणून बीडची आणि विधानसभा मतदारसंघ म्हणून परळीची ओळख. २००९ पासूनच मुंडे कुटुंबात धूसफूस होती. २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी विधानसभेच्या जागेवर धनंजय मुंडे यांनी हक्क सांगितला. परंतु, उमेदवारी पंकजांना मिळाली.
गंगाखेडमध्ये धनंजय यांचे मेहुणे डॉ. मधुसूदन केंद्रे यांना भाजपची उमेदवारी देऊन बंधू पंडितअण्णा यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न गोपीनाथ मुंडे यांनी केला होता. परंतु, २००९ मध्ये गंगाखेडमध्ये डॉ. केंद्रे पराभूत झाले आणि परळीत पंकजा विजयी झाल्या. पुढे कलह वाढतच गेला आणि पंडितअण्णा, जावई डॉ. केंद्रे आणि धनंजय यांनी राष्टÑवादी काँग्रेस जवळ केली. घर फुटले आणि पंकजा-धनंजय यांच्यातील राजकीय संघर्ष वाढतच गेला. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर सहा महिन्यांतच विधानसभा निवडणूक लागली. २०१४ मध्ये परळीत भाऊ-बहिणीत लढत होऊन पंकजा जवळपास २५ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या.
धनंजय मुंडे यांच्यासाठी २०१९ ची निवडणूक अस्तित्वाची लढाई होती. बीड जिल्ह्यातील सत्तासंघर्षात पंकजांनी धनंजय यांना तोंडघशी पाडले होते. स्थानिक स्वराज संस्था आणि केज विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने जाहीर केलेले उमेदवार पंकजा यांनी भाजपमध्ये आणले. पंकजांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी धनंजय यांनी आक्रमक प्रचार सुरू केला. सोशल मीडियाचा आधार घेत पंकजांवर आरोप होऊ लागले.
‘राजकारणातून संपविण्यासाठी पंकजांनी मला आणि माझ्या पत्नीला कसा त्रास दिला, जगमित्र सूतगिरणी प्रकरणात मी, बहीण आणि पत्नीवर गुन्हे दाखल झाले. या प्रकरणात माझ्या पत्नीला अटक करावी म्हणून पोलिस अधिकाऱ्यांना फोन केले, दूष्ट राक्षस म्हणून संबोधले’, अशा कितीतरी कौटुंबिक गोष्टींचा आरोप धनंजय यांच्या भाषणातून या निवडणुकीत पंकजांवर होऊ लागला. सोशल मीडियाचा वापर वाढला. शेवटच्या दोन दिवसांत विकासाचा मुद्दा बाजूला झाला. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप होऊ लागले.
१७ आॅक्टोबर रोजीच्या एका भाषणातील धनंजय यांनी पंकजांबद्दल केलेले विधान व हावभाव याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यावर ‘मी असे बोललोच नाही, ही क्लिप हेतूपुरस्सर एडिट करून माझी बदनामी केली’. हे सांगताना पत्रकार परिषदेत धनंजय यांना अश्रू आले.
पंकजांनी प्रचाराच्या समारोपीय भाषणात धनंजय यांच्यावर वैयक्तिक टीका करत त्यांचे सर्व आरोप खोडून काढले. यावेळी त्या खूपच भावनिक झाल्या होत्या. त्यातच डी-हायड्रेशन, दगदग यामुळे त्यांना व्यासपीठावरच अस्वस्थ वाटून भोवळ आली. त्यानंतर भाजप शहराध्यक्षांनी क्लिपच्या संदर्भात धनंजय यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंद झाला. आष्टी आणि परळीत पंकजा यांच्या समर्थनार्थ मतदानाच्या एक दिवस आधी मोठा जमाव रस्त्यावर उतरला. या निवडणुकीचा निकाल काहीही लागो, बहीण-भावातील नात्याचे अंतर मात्र वाढतच चालले आहे, हेच खरे.