पुरूषोत्तम करवा
माजलगाव : येथील आगारातून ग्रामीण भागातील फेऱ्या कमी झाल्या आहेत. शहरी भागातील चालणाऱ्या बसमुळे उत्पन्नात वाढ झाली असली तरी केवळ सात शहरांवर आगाराची मदार असून, ग्रामीण भागातील बसमधून केवळ विद्यार्थीच प्रवास करत आहेत. त्यामुळे सध्या हे आगार दररोज दोन लाख रुपये तोट्यात चालले आहे.
माजलगाव आगाराचे कोरोनापूर्वी उत्पन्न चांगले होते. लॉकडाऊननंतर या आगारातून केवळ शहरी भागात बस सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला या बस रिकाम्या धावत होत्या. त्यानंतर थोड्या फार प्रमाणात प्रवासी वाढू लागले. या आगारातून मोठ्या प्रमाणावर लांब पल्ल्याच्या बस सुरू असून, यात कोल्हापूर, नांदेड, मुंबई, लातूर, सोलापूर, मेहकर व बुलडाणा या सात ठिकाणी जाणाऱ्या बसचे उत्पन्न आगाराच्या ६५-७० टक्के एवढे आहे. यामुळे या आगाराची सात शहरांवर मदार असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. येथून जाणाऱ्या बस पूर्वी २० हजार किलोमीटर चालत असत. परंतु आता महिन्याला केवळ १७ हजार किलोमीटर चालतात.
या आगाराचा सध्या दररोजचा खर्च ६ लाख ५० हजार रुपये असून, उत्पन्न केवळ ४ लाख ५० हजार मिळत आहे. यापैकी ३ लाख रुपये उत्पन्न सात शहरांतून मिळते. यामुळे सध्या हे आगार दररोज दोन लाख रुपयांनी तोट्यात चालले आहे. सध्या या आगारातून चालणाऱ्या निमआराम, शिवशाही, स्लीपर कोच या बस मोठ्या प्रमाणावर तोट्यात दिसून येत आहेत. रातराणी बस फायद्यात चालत असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली.
माजलगाव आगारातून ग्रामीण भागात ९० टक्के बस सेवा सुरू करण्यात आली असली तरी या बसकडे प्रवासी पाठ फिरवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या बसमध्ये केवळ विद्यार्थीच येत आहेत. सध्या या आगारातून एक हजार विद्यार्थ्यांना पास वाटप करण्यात आले असले तरी आणखी तीन हजार विद्यार्थी पासपासून दूर आहेत.
या आगारातून लातूरला प्रत्येक तासाला बस जात आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत प्रत्येक तासाला लातूरला जाण्यासाठी बस उपलब्ध असून, येण्यासाठी १० वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत बस सुरू आहेत. लातूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी जास्त फेऱ्या चालू असल्याची माहिती आगार प्रमुख दत्तात्रय काळमपाटील यांनी दिली.