सुरक्षेअभावी माजलगाव धरण क्षेत्र ठरत आहे मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:33 AM2019-03-21T00:33:34+5:302019-03-21T00:35:27+5:30

माजलगाव धरण आणि दरवर्षी चार ते पाच मृत्यू अशी प्रथाच मागील चार ते पाच वर्षांपासून पडली आहे. धरणाच्या भिंतीवर पोलीस सुरक्षा ठेवली असून, प्रतिबंधित क्षेत्र असतानाही कसलीच सुरक्षा नसल्यामुळे हे क्षेत्र मृत्यूचा सापळा ठरत आहे.

Majelgaon dam area due to security reasons | सुरक्षेअभावी माजलगाव धरण क्षेत्र ठरत आहे मृत्यूचा सापळा

सुरक्षेअभावी माजलगाव धरण क्षेत्र ठरत आहे मृत्यूचा सापळा

Next
ठळक मुद्देनेमकी जबाबदारी कोणाची ? : सुरक्षेबाबत अभियंते व पोलिसांची टोलवाटोलवी; गत दहा दिवसांत धरण क्षेत्रात चौघांचे बळी

माजलगाव : माजलगाव धरण आणि दरवर्षी चार ते पाच मृत्यू अशी प्रथाच मागील चार ते पाच वर्षांपासून पडली आहे. धरणाच्या भिंतीवर पोलीस सुरक्षा ठेवली असून, प्रतिबंधित क्षेत्र असतानाही कसलीच सुरक्षा नसल्यामुळे हे क्षेत्र मृत्यूचा सापळा ठरत आहे. या बाबत प्रशासन आणि पोलीस मात्र टोलवाटोलवीची भूमिका घेत आहे.
माजलगाव धरणाचे क्षेत्र हे जवळपास १५ किलोमीटर व्यासाचे आहे. मागील बाजूला सुमारे २२ किलोमीटर इतके आहे. माजलगाव शहरात तसेच भोवती जवळपास ११ गावातील जमिनी धरणात गेल्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. येथील लोक हे धरण क्षेत्रात सर्रास वावरतात. तसेच कपडे धुण्यासाठी, पोहण्यासाठी येथे येतात.
अनेक लोकांना धरणात कोठे खड्डे आहेत किंवा कुठे जास्त पाणी आहे याचा अंदाज आहे. मात्र, नवीन लोकांना याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अनेक घटना येथे घडतात. वास्तविक धरण क्षेत्रामध्ये वावरणे हे शासनाने प्रतिबंधित केलेले आहे. परंतु याचे कुठेही पालन होताना दिसत नाही.
माजलगाव धरणात अनेक गावे गेलेली आहेत. त्यामुळे त्या गावातील असणाऱ्या विहिरीदेखील धरणाच्या पाण्याखाली आहेत. तसेच रस्त्याच्या कामासाठी धरणाच्या पाण्याकडील बाजूस मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन देखील झालेले आहे. त्याचे देखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत व त्यात पाणी साचून त्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही.
गत दहा दिवसात धरण क्षेत्रात बुडून चौघांचा बळी गेला. त्याला कारणीभूत ते स्वत: जितके आहेत तितकीच यंत्रणा देखील आहे. प्रतिबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वावर असतानाही यंत्रणेची कसलीही नजर यावर नाही. त्यामुळे यंत्रणा देखील यात दोषी आहे. धरण क्षेत्रात सुरक्षा वाढविण्यावर तसेच प्रतिबंधित क्षेत्रावरील वावर बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
धरण अभियंता व पोलिसांकडून सुरक्षेवरून टोलवाटोलवी
अभियंता राजेंद्र दहातोंडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांकडे असते. त्यामुळे सुरक्षेबाबत आमचा कोणताही हस्तक्षेप नसतो.
दुसरीकडे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणाले की, आमच्यावर धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी असली तरी धरण क्षेत्राची जबाबदारी मात्र धरण अभियंता यांची आहे.
दोन्ही अधिकारी अशा पद्धतीने एकमेकांवर टोलवाटोलवी करीत असल्याने जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Majelgaon dam area due to security reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.