अंबाजोगाई तालुक्यात किसान योजनेच्या लाभापासून अनेक शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:20+5:302021-07-01T04:23:20+5:30
अंबाजोगाई : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत एक वर्षाच्या अंतरात तीन टप्प्यांत २ हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ...
अंबाजोगाई : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत एक वर्षाच्या अंतरात तीन टप्प्यांत २ हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. त्याअनुषंगाने यावर्षी अंबाजोगाई व परिसरातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर, अनेक शेतकरी अजूनही या अनुदानापासून वंचित आहेत.
एकीकडे आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही, असे जाहीर करून खात्यात जमा झालेले पैसे परत करण्याच्या नोटिसा दिल्या. मात्र, त्यानंतरही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा २००० रुपये जमा करण्यात आले. हा प्रशासनाचा सावळागोंधळ असून प्रशासन शेतकऱ्यांप्रति किती जागरूक आहे, याचा प्रत्यय येत आहे. दीड महिन्याचा कालावधी लोटला असूनही अंबाजोगाई व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा झालेले नाहीत. या संदर्भात तहसील कार्यालयात चौकशी केली असता पंतप्रधान किसान योजनेचे काम आता कृषी विभागाकडे दिले आहे. तेथे जाऊन तक्रार करा. तर, कृषी विभागाकडून असा कुठलाही आदेश नसल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही कार्यालयांचे उंबरठे झिजवून हताश शेतकरी आता दाद मागावी तरी कुणाकडे? अशा विवंचनेत आहेत.
...
शेतक-यांना न्याय द्यावा
पी.एम. किसान योजनेचे काम तहसीलकडेच होते. काही शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात याबाबत अर्जदेखील केला. मात्र, कुणीही या प्रकरणाची चौकशी करून दखल घेण्यास तयार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनीच आता याची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे.