मराठवाडा साहित्य संमेलनात आशयघन कवितांची बरसात; निमंत्रितांच्या व शिक्षक कविसंमेलनास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 12:50 PM2017-12-25T12:50:08+5:302017-12-25T12:54:26+5:30

साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनात कवी मंडळींनी विविध विषयांवर आशयघन कविता सादर करीत रसिकांची दाद मिळविली. दुसरीकडे स्वतंत्र निर्माण केलेल्या व्यासपीठावर शिक्षक कवींनी शेतकर्‍यांच्या व्यथा-वेदनांंना आपल्या काव्यातून वाट मोकळी करून दिली.

Marathwada Sahitya Sammelan discusses intense poems; Spontaneous response from the participants of the invitees and teachers' poetry | मराठवाडा साहित्य संमेलनात आशयघन कवितांची बरसात; निमंत्रितांच्या व शिक्षक कविसंमेलनास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाडा साहित्य संमेलनात आशयघन कवितांची बरसात; निमंत्रितांच्या व शिक्षक कविसंमेलनास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्देबाबासाहेब पुरंदरे व्यासपीठावर निमंत्रितांच्या ‘जंबोजेट’ कविसंमेलनात ५० कवींनी विक्रमी सहभाग नोंदविला.शिक्षकांसाठी स्वतंत्र निर्माण केलेल्या व्यासपीठावर शिक्षक कवींनी शेतकर्‍यांच्या व्यथा-वेदनांंना आपल्या काव्यातून वाट मोकळी करून दिली. 

- मल्हारीकांत देशमुख

अंबाजोगाई (स्वामी रामानंद तीर्थ नगरी) : बाबासाहेब पुरंदरे व्यासपीठावर निमंत्रितांच्या ‘जंबोजेट’ कविसंमेलनात ५० कवींनी विक्रमी सहभाग नोंदविला. ज्येष्ठ कवी जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात कवी मंडळींनी विविध विषयांवर आशयघन कविता सादर करीत रसिकांची दाद मिळविली.

मेहनत न करणार्‍यांचं
रान कसं पिकलं
म्हणून विचारतो जोतिबा 
गणित कुठं चुकलं?

अध्यक्षस्थानावरून जगदीश कदम यांनी पहिली कविता सादर केली. त्यानंतर सोपान हाळमकर यांनी ‘संवेदना’, तर भगवान अंजर्णीकर यांनी ‘काजव्यांचा दीपोत्सव’, राजेश दिवेकर यांनी ‘अपेक्षांचे ओझे’ या कविता सादर केल्या.

‘माय बाप भंगारात 
खाण्यासाठी झुरतात
वाट पाहत मरणाची कसेबसे जगतात
वरवरचे बदल केवळ ही रंगरंगोटी
वेळप्रसंगी दिसते आतली लंगोटी’

बदलत्या समाज जीवनावर केशव बा. वसेकर यांनी ताशेरे ओढले. सय्यद अल्लाउद्दीन यांच्या ‘भ्रष्टाचार’ या विनोदी कवितेला उपस्थितांनी दाद दिली. मीरा निसळे, शशिकांत हिंगोणेकर यांच्या सामाजिक आशयावरील कविता, तर वीरा राठोड यांच्या खास बीडच्या शैलीत सादर करण्यात आलेल्या राजकीय व्यंगाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे
स्वत:च आपली राख उधळीत जाणे
नारायण पुरी यांची ही कविता उल्लेखनीय ठरली. 
बालाजी इंगळे, चंद्रशेखर मलकमपट्टे यांच्या कविता रसिकांना अंतर्मुख करून गेल्या. स्त्रियांची होणारी घुसमट व्यक्त करणार्‍या रंजना कंधारकर, आशा डांगे यांच्या कवितांनी वातावरण गंभीर केले. 

या पार्श्वभूमीवर डी.के. शेख यांच्या राजकीय व्यंगावर हंशा पिकला. अंकुश नेणगीकर यांच्या ‘सावित्रीच्या लेकी’ तर प्रिया धारूरकर, संजय धाडगे यांच्या कविता वेगळ्या वळणाच्या होत्या.

‘आली जवळ दोघे 
प्रेमपणाच्या ओढीनं
दूर डोलीत बसली
राघू नि मैना जोडीनं’

पंजाब मोरे यांच्या रचनेला श्रोत्यांनी टाळ्याने दाद दिली.
पैठण येथील संदीप जगदाळे  यांनी कवितेतून मांडलेली शाळाबाह्य विद्यार्थ्यांची व्यथा, तर रमेश कदम यांची ‘कॉर्पोरेट शाळा’ ही कविता मनाला भिडवून गेली. शिवाजी मेनकुदळे यांचे ‘पेरणी गीत’ उपस्थितांची दाद मिळवून गेले. सत्यप्रेम लगड यांची पाणंदमुक्तीवरची व्यंगात्मक कविता वातावरण हलकेफुलके करून गेली.

कविसंमेलनासाठी गोव्यावरून आलेल्या चित्रा क्षीरसागर या कवयित्रीने

‘पोरी ऋतू नसताना 
उमलत चालल्यात
बिनापानाच्या चाफ्यासारखं 
फुलत चालल्यात’

हे कटू सत्य मांडले. सुरेश हिवाळे यांची ‘प्रार्थना’ मनाला भिडणारी होती. 
व्यासपीठावर तब्बल पन्नास कवी असल्याने कविसंमेलनाचे सूत्रसंचालन करणार्‍या कवी नीलेश चव्हाण यांना फार मोठी कसरत करावी लागली. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर रसिक श्रोत्यांनी गर्दी केली होती.

शिक्षक कविसंमेलनात शेतकर्‍यांचे दु:ख उजागर

शिक्षकांसाठी स्वतंत्र निर्माण केलेल्या व्यासपीठावर शिक्षक कवींनी शेतकर्‍यांच्या व्यथा-वेदनांंना आपल्या काव्यातून वाट मोकळी करून दिली. 

‘मी नभाला पुसले
आता माझे ओले डोळे
झेलीत बसलो 
मातीमधून दुष्काळी हिंदोळे’

या कवितेने श्रोत्यांंना अंतर्मुख केले. कवी प्रभाकर साळेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांचे कविसंमेलन शैला लोहिया  व्यासपीठावर पार पडले. संमेलनाच्या प्रारंभी साळेगावकर यांनी ‘सारंच आभाळ टारगट झालंय’ ही शेतकर्‍यांच्या स्वप्नातील पावसाविषयी असलेल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर विलास डिग्गीकरांची

‘पाऊस  मिरगसरीने निघून 
जातो पाऊस काळ
जीवनाची भाषा लिहितो, 
शेती नांगराचा फाळ’

ही कविता रसिकांची दाद मिळवून गेली. यानंतर दिनकर जोशी, सूर्यकांत डोळसे, उमेश मोहिते, अनंत कराड, गणपत व्यास, शरद रांजवण, राजेंद्र लाड, जनार्दन सोनवणे, संगीता सपकाळ, सुरेखा खेडकर आदी कवींंनी आपल्या कविता सादर केल्या. सूत्र संचालन अरुण पवार यांनी केले.

Web Title: Marathwada Sahitya Sammelan discusses intense poems; Spontaneous response from the participants of the invitees and teachers' poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.