मराठवाडा दुष्काळमुक्त करुन गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पूर्ण करणार - फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 03:26 AM2019-06-04T03:26:36+5:302019-06-04T03:26:47+5:30
गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगड परिसरात आयोजित कार्यक्र मास मुख्यमंत्री उपस्थित होते
बीड : विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याचा सर्वांगिण विकास आणि दुष्काळमुक्तीचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंडे यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण घडल्याचा उल्लेख त्यांनी केला.
गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगड परिसरात आयोजित कार्यक्र मास मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार लोकनेते मुंडेंच्या विचाराचे सरकार आहे. कृष्णा खोऱ्यातील २५ टी.एम.सी. पाणी मराठवाड्याला मिळण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. दुष्काळनिवारण्यासाठी केंद्र सरकारकडून १,३०० कोटी रु पयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
इस्रायलसोबत करार
केंद्र सरकारच्या सहकार्याने पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी समुद्रात जावू नये यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोºयात आणण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. मराठवाडा वॉटरग्रीडसाठी इस्रायलसोबत करार करण्यात आला आहे. पाच विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
राज्यातील भाजपच्या यशात मुंडे यांचा वाटा आहे. मुंडे- महाजन यांच्या पायाभरणीमुळे राज्यात पक्षाला हे यश मिळाले, असे ते म्हणाले. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.