माता न तू वैरिणी... केजमध्ये मुलीचे पैशांसाठी चक्क खोटे लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:34 PM2018-05-16T23:34:55+5:302018-05-16T23:34:55+5:30
दीपक नाईकवाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : मुलीच्या भविष्याचा विचार न करता अविचाराने लाख रुपये घेत मुलीचे खोटे लग्न लावून दिले. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेवाची फसवणूक करत ऐवजासह पोबारा करणाºया नववधू, तिची आई आणि या प्रकरणातील साथीदाराला जेलची हवा खावी लागली. या प्रकरणात आईने पैशाच्या लोभापायी मुलीचे उज्ज्वल भवितव्य उद्ध्वस्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पैशाचा मोह कोणाला काय करण्यास भाग पाडेल, हे सांगता येत नाही. पैशाच्या हव्यासापायी नाती गोतीही माणसे विसरत चालली आहेत. ज्या आईने जन्म दिला, त्याच आईने पैशासाठी आपल्या मुलीचा खोटा विवाह करत आपल्याच मुलीचे भवितव्य उद्ध्वस्त केल्याचा प्रकार केजमध्ये उघडकीस आला.
केज शहरातील क्रांतीनगर भागातील एक महिलेला तिच्याच मुलीचे खोटे लग्न लावण्यासाठी मीनाक्षी पोहरे हिने पैशांचे आमिष दाखवले. खोटे लग्न लावून देणाºया टोळीची मीनाक्षी सूत्रधार आहे. या महिलेने तीस हजार रुपये घेत मुलीचे खोटे नाव सांगून तिचा विवाह लावून दिला. तिच्यासोबत असलेल्या मावशीने लग्नाच्या तिसºया दिवशी नववधूच्या वडिलांना दवाखान्यात दाखल केल्याचा बहाणा करून बीड येथे येत साथीदाराच्या मदतीने भाचीसह पोबारा केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्लेगाव ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार नवरदेवाने केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांनी करत या टोळीची सूत्रधार मीनाक्षी पोहरे व तिच्या दोन साथीदारास अटक केल्यानंतर या खोट्या लग्नाचे धागेदोरे केजपर्यंत पोहोचले व केज शहरातील क्रांतीनगर भागातील या महिलेस अटक केली.
फसवणूक केल्या प्रकरणी तिला व तिच्या कृत्यात सहभागी असलेल्या मुलीस शिल्लेगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांनी बेड्या ठोकून गंगापूर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोघींसह या प्रकरणात सहभागी असलेल्या पाचही जणांची न्यायालयीन कोठडी सुनावत हर्सूल कारागृहात रवानगी केली.