माध्यमांनी काेविड रुग्णांचे मनोधैर्य वाढवणाऱ्या बातम्या द्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:33 AM2021-04-10T04:33:09+5:302021-04-10T04:33:09+5:30
अंबाजोगाई : सध्या कोविड संक्रमणाचा काळ हा आपल्या सर्वांच्याच दुर्दैवाने अतिशय वाईट असून या काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन समाज ...
अंबाजोगाई : सध्या कोविड संक्रमणाचा काळ हा आपल्या सर्वांच्याच दुर्दैवाने अतिशय वाईट असून या काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन समाज माध्यमांनी कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे मनोधैर्य वाढवणाऱ्या बातम्या प्रसिद्ध कराव्यात, असे कळकळीचे आवाहन मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांनी केले आहे.
सध्या बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण निघण्याची संख्या सर्वाधिक आहे. तालुक्यातील शेकडो रुग्ण दररोज कोविड उपचारासाठी स्वारातीच्या रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. शिवाय अंबाजोगाई येथील कोविड उपचाराबद्दल रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाल्यामुळे या परिसरातील सात-आठ तालुक्यांतील रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत.
येथे कोविडच्या उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांमध्ये वयोवृद्धांची संख्या जास्त आहे. आपल्या कुटुंबीयांना सोडून दूर राहून प्रत्येक रुग्णाला कोविडचा उपचार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत कोविडविषयी भीती दर्शविणाऱ्या बातम्या समाज माध्यमातून प्रसिद्ध होत राहिल्या तर उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण होते. व त्याचा परिणाम त्यांचे आरोग्य बिघडण्यासाठी होतो. याउलट जर सकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्या तर त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
वैद्यकीय डॉक्टर, कर्मचारीही जातात डिप्रेशनमध्ये
अंबाजोगाई येथीलच नव्हेतर, संपूर्ण राज्यातील डॉक्टर, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचारी गेल्या वर्षभरापासून आपले, आपल्या कुटुंबीयांचे भवितव्य विसरून सतत कोविड रुग्णांच्या सेवेत काम करीत आहेत. हे करताना अनेक डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोविडचा प्रादुर्भाव झाला. हे सर्व विसरून ते परत रुग्ण सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे कोविड रुग्ण सेवेबद्दल सकारात्मक बातम्या समाज माध्यमात उमटल्या तर त्यांचे मनोधैर्य वाढेल.
निरंक मृत्यूची हवी बातमी
कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कोविडसोबत विविध व्याधी असतात. अनेक वयोवृद्ध रुग्ण या आजाराला बळी पडत आहेत. एखाद्या दिवशी जास्त रुग्ण मृत्यू पावले तर त्याची बातमी येते; मात्र ज्या दिवशी एकही मृत्यू होत नाही त्याचीही बातमी यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.