लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील काही दिवसांपासून छेडछाड व वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राचार्य, मुख्याध्यापक यांची पोलिसांनी बैठक घेतली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात सुचना करण्यात आल्या. तसेच सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी केले.बैठकीला प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक रोशन पंडित यांच्यासह पो.नि.बाळासाहेब बडे, सपोनि शीतलकुमार बल्लाळ, सपोनि.नितीन पगार, सपोनि.श्रीकांत उबाळे, बी.एस.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत मुख्याध्यापक प्राचार्यांच्या सूचना ऐकण्यात आल्या. महिला व मुलींची छेडछाड रोखणे, वाहतुकीचे नियम पाळणे, महाविद्यालयात गुंडागर्दी टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांना नशेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी कोणते उपाय करायचे याचे माहितीपत्रक पोलिसांच्या वतीने वतीने सर्वांना देण्यात आले.शाळा, महाविद्यालयात तक्रार पेट्या ठेवून त्यात आलेल्या तक्रारीची नोंद महाविद्यालयातील रजिस्टरवर करून घ्यावी. गरज पडल्यास पोलिसांना माहिती द्या. विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरीची नोंद ठेवा. शाळा, महाविद्यालयात गुंडगिरी करणा-या आणि शस्त्र बाळगणा-यांची माहिती पोलिसांना द्या. शाळा, महाविद्यालयात दुचाकी घेवून येणा-या विद्यार्थ्यांचे वाहन परवाने तपासा. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करा, अशा सूचना उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी दिल्या.तसेच सर्व शाळा महाविद्यालयातील एका शिक्षकाला वाहतूक व इतर मुद्यांवर प्रशिक्षण दिले जाईल. त्या शिक्षकाने आपल्या शाळेत जावून विद्यार्थ्यांना माहिती द्यावी.तसेच प्रत्येक महिन्याला मुख्याध्यापक, प्राचार्यांची बैठक घेतली जाणार असल्याचेही खिरडकर म्हणाले.
पोलीस-प्राचार्यांची विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:53 AM