शेतातून येणाऱ्या महिलेचा विनयभंग; वाच्यता होताच आरोपींच्या पत्नींकडून पिडीतेला केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 02:40 PM2020-08-06T14:40:19+5:302020-08-06T14:48:16+5:30
अंबाजोगाई तालुक्यात घडलेल्या या प्रकरणात ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
अंबाजोगाई : शेतात जनावरे चारून परतणाऱ्या महिलेस दोघांनी रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्या दोघांच्या पत्नींनी त्या महिलेस बेदम मारहाण केली. अंबाजोगाई तालुक्यात घडलेल्या या प्रकरणात ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ३५ वर्षीय पीडिता सोमवारी जनावरे चारून सायंकाळी ७ वाजता शेतातून घराकडे निघाली होती. त्या राहत असलेल्या तांड्यावर राहणारे सचिन राजाभाऊ आडे व सुनील राजाभाऊ आडे या दोघांनी तिला रस्त्यात अडविले आणि तिचा विनयभंग केला. यावेळी पिडीतेचा आरडाओरडा ऐकून आजबाजूच्या शेतातील ग्रामस्थ येत असल्याचे पाहून त्या दोघांनी पिडीतेला झाल्या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या देत पळ काढला. त्यानंतर पिडीतेने घरी येऊन सर्व घटना कुटुंबियांना सांगितली.
त्यावेळी आरोपींच्या पत्नी रेणुका सचिन आडे आणि चांगुना सुनील आडे या दोघी तिथ आल्या. आमच्या नवऱ्यावर का आळ घेतेस असे म्हणत त्या दोघींनी पिडीतेला बेदम मारहाण केली असे पिडीतेने पोलीसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी चारही आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला.