बीडमध्ये सीझर प्रसुतीनंतर मातेचा २९ तासांतच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:50 PM2019-09-18T18:50:03+5:302019-09-18T18:52:34+5:30
नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
बीड : सिझर होऊन प्रसुत झालेल्या मातेचा अवघ्या २९ तासांतच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. यात मातेने जन्म दिलेला चिमुकला सुखरूप आहे. बीडच्या जिल्हा रूग्णालयातील माता मृत्यूने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.
अश्विनी विष्णू कळसुले (२४ रा.नागझरी ता.बीड) असे या मातेचे नाव आहे. १६ सप्टेबर रोजी अश्विनी यांना सकाळी ९ वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल केले. १२ वाजेच्या सुमारास त्यांना शस्त्रक्रिया गृहात घेऊन त्यांचे सिझर केले. यावेळी त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर अवघ्या चार ते पाच तासांनी तिच्या छातीत दुखायला सुरूवात झाली. नातेवाईकांनी डॉक्टरांना कळविले. उपचारही करण्यात आले. मात्र, त्यानंतर हा त्रास कमी झालाच नाही. शेवटी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजेच्या सुमारास अश्विनी यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू केल्यानंतर अवघ्या दोन तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालय परिसरात टाहो फोडला.
दरम्यान, अश्विनीच्या छातीत दुखत असल्याबाबत वारंवार येथील परिचारीका आणि डॉक्टरांना सांगितले होते. मात्र, त्यांनी उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उपचारात हलगर्जी आणि वेळेवर उपलब्ध न होणाºया डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. याबाबत त्यांनी लेखी कसलीही तक्रार आरोग्य विभागाकडे केली नसल्याचेही समजते.
कुटूंबात पहिल्यांदाच हलला पाळणा
अश्विनी यांचे विष्णू यांच्यासोबत ७ मे २०१८ रोजी लग्न झाले होते. त्या गर्भवती राहिल्यावर उखंडा येथे माहेरी आल्या. त्यांची प्रसुती झाल्यावर कळसुले कुटूंब आनंदी होते. मात्र, हा आनंद काही क्षणापुरताच होता. विशेष म्हणजे विष्णू यांना छोटा भाऊ असून तो लहान आहे. पहिल्यांदाच कळसुले कुटूंबात पाळना हालला होता.
चिमुकल्याची प्रकृती ठणठणीत
अश्विनी यांनी एका चिमुकल्याला जन्म दिला आहे. सध्या हे बाळ नातेवाईकांकडे आहे. त्याला वरवरचे दुध पाजले जात आहे. सध्या त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
दोषींवर कारवाई करू
माता मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आले. मी स्वता: उपस्थित होतो. मृत्यू कशामुळे झाला, प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालावरून समजेल. यात डॉक्टर दोषी असतील तर नक्कीच कारवाई करू.
डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
वेळेवर उपचार मिळाले नाहीत
प्रसुती झाली तेव्हा बहिण सुखरूप होती. काही तासांनी छातीत दुखायला लागल्यावर डॉक्टरांना बोलविले. मात्र, वेळेवर कोणीच उपलब्ध नव्हते. मृत्यूच्या आगोदर काही तासांनी अतिदक्षता विभागात नेले. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जी केली तसेच वेळेवर उपस्थित न झाल्यानेच मृत्यू झाल. चौकशी करून कारवाई करावी.
- गणेश मुळीक, मयत अश्विीनी यांचा भाऊ