: फक्त सलून व्यवसायासच बंदी का ? सलून व्यवसाय तत्काळ सुरु करावा, या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील नाभिक समाजाच्या वतीने माजलगाव मतदारसंघाचे आ. प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. मागण्या तत्काळ मान्य न केल्यास महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये ब्रेक द चेनची घोषणा केली. यात सलून व्यवसाय बंद राहील अशी घोषणा केली . महाराष्ट्रातील नाभिक समाजावर हा खूप मोठा अन्याय आहे. पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये नाभिक समाजातील सलून व्यावसायिकांचे अक्षरशः
कंबरडे मोडले. लॉकडाऊन उठल्यानंतर सलून चालकांनी घरातील दागिने विकून दुकान भाडे,घर भाडे व वीज बिलांचा भरणा केलेला आहे. तसेच कर्जाचे हप्ते भरताना समाज मेटाकुटीला आलेला आहे. अशावेळी परत सलून व्यवसायावर बंदी घातलेली आहे. त्यामुळे आता जगायचे कसे हा प्रश्न नाभिक समाजासमोर पडलेला आहे.
लोकप्रतिनिधी या नात्याने आ. सोळंके यांनी शासनाकडे नाभिक समाजाच्या मागण्या संदर्भात लक्ष केंद्रित करुन न्याय मिळवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सलून दुकाने पूर्ववत सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, सर्व वयोगटातील सलून कारागीर व व्यावसायिकांना तत्काळ कोरोना प्रतिबंधक लस द्यावी, कोरोना काळातील आत्महत्याग्रस्त सलून व्यावसायिकांच्या कुटुंबांना त्वरित आर्थिक मदत द्यावी आदी मागण्याचे निवेदन आ. प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर आंदोलन करुन त्यांचा मुलगा विरेंद्र सोळंके व नायब तहसीलदार अशोक भंडारे यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मराठवाडा अध्यक्ष युवराज शिंदे, नागेश खटले, सुनील दळवी, सखाराम झगडे,सागर दळवी, रामदास राऊत, सदाशिव सवने, वसंतराव बहिरे, जगदीश गोरे,कृष्णा काळे,आदी समाजबांधव उपस्थित होते.
===Photopath===
090421\purusttam karva_img-20210409-wa0018_14.jpg