खून प्रकरण; तिघांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:18 AM2019-08-10T00:18:56+5:302019-08-10T00:19:23+5:30
शेतीच्या वादातून शहराच्या जवळ असलेल्या वासनवाडी शिवारात तीन सख्ख्या भावांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. यातील आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
बीड : शेतीच्या वादातून शहराच्या जवळ असलेल्या वासनवाडी शिवारात तीन सख्ख्या भावांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. यातील आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच आरोपींकडून खूनात वापरलेला चाकू देखील हस्तगत करण्यात आला आहे.
शहराजवळील वासनवाडी शिवारात शेतीच्या वादातून २७ जुलै रोजी दिलीप, प्रकाश, किरण पवने या सख्ख्या भावांचा, त्यांच्याच भावाने व पुतण्यांनी निर्घृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी किसन पवने, डॉ.सचिन पवने व अॅड. कल्पेश पवने या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना दोन वेळा पोलीस कोठडी सुनावली होती. ९ आॅगस्ट रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २७ रोजी खून करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यारे परिसरातील विहिरी टाकले होते. या विहिरीतील पाणी मोटारच्या सहाय्याने काढून हत्यारे हस्तगत केली होती. त्यानंतर शहराच्या जवळून जाणाऱ्या एका ओढ्याजवळ चाकू फेकल्याची माहिती तपासादरम्यान आरोपींनी दिली. तो चाकू देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उप अधीक्षक भास्कर सावंत व बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी सुजीत बडे हे करत आहेत. पुढील तपास सुरू राहणार असून तपास पूर्ण झाल्यनंतर पोलिसांकडून चार्जशिट दाखल करण्यात येणार आहे.
हलाखीची परिस्थिती कुटुंबियांना केली मदत
या प्रकरणात खून झालेल्या दिलीप, प्रकाश व किरण या तिघांचीही परिस्थिती हलाखीची होती. तसेच यांच्यावरच त्यांची कुटुंबे अवलंबून होती. अचानक त्यांच्या मृत्यूने सामाजिक क्षेत्रातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत मचाले व अन्य एकाने पवने कुटुंबियांना आर्थिक मदत केली. अनेक हात पुढे सरसावत असल्याचे दिसून येत आहे.