जलसाठा निर्मितीसाठी राष्ट्रीय पुरस्काराने बीड जिल्हा सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:15 AM2019-02-26T00:15:06+5:302019-02-26T00:15:26+5:30
जलसंधाणामध्ये केलेल्या चांगल्या कामांसाठी महाराष्ट्र राज्याने मानाचे स्थान मिळविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जलसंधाणामध्ये केलेल्या चांगल्या कामांसाठी महाराष्ट्र राज्याने मानाचे स्थान मिळविले आहे. यामध्ये बीड जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला असून सोमवारी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला, यामध्ये केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री राम शिंदे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे यावेळी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यात मागील चार वर्षात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. विविध सामाजिक संस्थांनीही जलसंधारणासाठी मोठे काम केले आहे. पाणीसाठे निर्मिती करण्यामध्ये बीड जिल्हा देशात सर्वप्रथम आला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जलसाठे भरु शकले नव्हते. मात्र, भविष्यात या जलसाठ्यांचा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मागील दोन वर्षात जिल्ह्यात जवळपास ८ हजार विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक विहीरी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने यावर्षी पुन्हा ६ हजार ५०० विहिरींचे वाढीव उद्दिष्ट देण्यात आले आहे.