नवीन जिल्हा परिषद इमारतीत संभाजी महाराज, डॉ. आंबेडकर, गोपीनाथ मुंडे यांचे पुतळे उभारण्यासाठी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:35 AM2021-08-15T04:35:17+5:302021-08-15T04:35:17+5:30
बीड : नवीन जिल्हा परिषद इमारतीत छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपीनाथ मुंडे यांचे पुतळे उभारण्यासाठी मदत करणार, ...
बीड : नवीन जिल्हा परिषद इमारतीत छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपीनाथ मुंडे यांचे पुतळे उभारण्यासाठी मदत करणार, असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न आहे. बीड जिल्ह्याची मागास जिल्हा म्हणून असलेली ओळख दूर करणार, असेही ते म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, आमदार प्रकाश सोळुंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, आ.लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, आ. सुरेश धस, आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगामामध्ये पीक कर्ज वाटपाचा आणि महावितरणच्या मार्फत शेतीपंपासाठी वीज पुरवठ्याचा ट्रान्सफाॅर्मर नादुरुस्तीमुळे प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी पंपांना वीज पुरवठा नसल्याने यंदा विहिरी, तळे, नाले यामध्ये चांगले पाणी असून देखील पिकांना पाणी देता येत नाही, ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली असल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पीक नुकसानीचे पंचनामे करावेत. जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या खरीप पीक कर्ज वितरणाबाबतच्या प्रश्नात लक्ष घालून तो प्राधान्याने सोडविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या जिल्हा समन्वयकांची बैठक घ्यावी. राष्ट्रीयीकृत, खाजगी बँका यांचे पीक कर्ज वितरण उद्दिष्टापेक्षा कमी झाल्याचे आढळून येत आहे, यातील कारणांचा शोध घेऊन प्रश्न तातडीने सोडविला जावा, असे मुंडे यांनी सांगितले.
बीड जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बीड जिल्ह्याचे भाग्यविधाते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे या महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने घेतला आहे, याचा आनंद होत असून यासाठी जिल्हा नियोजन समितीतून लागेल तो निधी आणि सर्व मदत केली जाईल, असे पालकमंत्री मुंडे यांनी आश्वस्त केले.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी बीड जिल्ह्यामध्ये चांगले काम करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्यात येईल आणि या पहिल्याच जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केली जातील, अशी खात्री देतो, असे सांगितले
सर्व सदस्यांनी ऊसतोड मजुरांच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात १२ वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकार आणि पालकमंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ऊसतोड मजुरांच्या पाल्यांच्या वसतिगृहांबाबत महिला व बालकल्याण विभागाकडे सविस्तर प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगितले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी गुरव यांनी केले.