शेतीची खातेफोड होऊन वेगळे झाले तरी मिळणार नाही लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:39 PM2019-02-17T23:39:30+5:302019-02-17T23:40:00+5:30
केंद्र शासनाने यावर्षीचा अर्थसंकल्प मांडला त्यावेळी अल्पभूधारक शेतकºयांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला होता.
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : केंद्र शासनाने यावर्षीचा अर्थसंकल्प मांडला त्यावेळी अल्पभूधारक शेतकºयांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला होता. या योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, या योजनेचा लाभ देण्यासाठी शेतीची खातेफोड झालेली असेल तरीदेखील संपूर्ण कुटुंब गृहित धरले जाणार असल्यामुळे अनेक शेतकºयांना या योजनेपासून वंचित राहवे लागणार आहे. सर्व कागदपत्रे देऊन देखील लाभ मिळणार नसल्यामुळे शेतकºयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यात जवळपास ६ लाख ५१ हजार ७८३ शेतकरी संख्या आहे. त्यापैकी जवळपास ५.५० लाख अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. मात्र, यापैकी फक्त दोन ते अडीच लाख जणांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. येत्या २० फेब्रुवारीपर्यंत युद्धपातळीवर काम करुन पात्र अल्पभूधारक शेतकºयांची माहिती पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना पत्राद्वारे कृषी सचिवांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. त्यामुळे रविवार व छत्रपती शिवाजी महाराज जयंती या शासकीय सुटीच्या दिवशी देखील संबंधित अधिकारी कर्मचाºयांना काम करावे लागणार आहे.
पीएम-किसान योजनेच्या माध्यमातून दिलेल्या तारखेच्या आत अल्पभूधारक शेतकºयांची माहिती अपलोड करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व इतर काही कर्मचाºयांना या योजनेच्या कामात सहभागी करुन घेतले आहे. अल्पभूधारक शेतकºयांची नावे सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यानंतर एकाच कुटुंबातील नावांचे वर्गीकरण होणार आहे. त्यानंतर त्या कुटुंबाचे शेतीचे क्षेत्र दोन हेक्टरपेक्षा जास्त होत असेल तर या योजनेचा लाभ त्या कुटुंबाला मिळणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकºयांची संख्या जरी ५.५० लाख असली तरीदेखील लाभ मात्र फक्त दोन ते अडीच लाख शेतकºयांना होणार आहे. त्यामुळे शेतकºयांमधून योजनेविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
विभक्त कुटुंब पद्धती.... अनेक शेतकरी कुटुंब हे विभक्त झालेले आहेत, त्यांनी शेतजमिनीची खातेफोड करुन प्रत्येकजण वैयक्तिक शेतीची वहिती करत आहेत. मात्र, तरी देखील या योजनेसाठी खातेफोड झालेले असताना कुटुंबाची एकत्रित शेती ही दोन हेक्टरपेक्षा अधिक दिसत असल्यामुळे पात्र असून देखील लाभ मिळणार नाही, त्यामुळे ज्या शेतकºयांच्या नावे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र आहे त्यांना सरसकट योजना लागू करण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.
२४ फेब्रुवारीला योजनेचा शुभारंभ ... योजनेचा शुभारंभ येत्या २४ तारखेपासून करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. २० फेब्रुवारी पर्यंत सर्व जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाची माहिती अपलोड करण्यात येणार आहे. शासकीय सुटी रद्द करुन संबंधीत अधिकारी,कर्मचाºयांनी कार्यालयात हजर राहून माहिती अपलोड करण्याच्या वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या आहेत.