नरेगा गैरव्यवहारप्रकरणी १४ सरपंच, ७५ ग्रामसेवकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:38 AM2021-08-13T04:38:11+5:302021-08-13T04:38:11+5:30
धारूर : नरेगामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणी धारूर तालुक्यातील दहा गावांच्या १४ सरपंचांसह ७५ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात ...
धारूर : नरेगामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणी धारूर तालुक्यातील दहा गावांच्या १४ सरपंचांसह ७५ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती समोर आली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नरेगामधील गैरव्यवहारप्रकरणी तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. या प्रकरणी आता महसूल विभागाकडून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली असून बीड जिल्ह्यातील जवळजवळ ५०० सरपंच आणि ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात धारूर तालुक्यातील ७५ ग्रामसेवक व १४ सरपंचांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या नरेगाच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या, यासोबतच ज्या कामाच्या ऑडिटनंतर काम नियमबाह्य झाले असल्याचे पुढे आले होते, त्याच ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवक तसेच रोजगार सेवकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. या नोटिसीला तीन दिवसांत उत्तर मागितले आहे.
धारूर तालुक्यातील ७५ ग्रामसेवक व १४ सरपंचांना या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. तालुक्यातील कोळपिंपरी, रुइधारूर, तेलगाव, उमरेवाडी, पिंपरवाडा, सुरनरवाडी, कासारी, गांजपूर, मुंगी, चिंचपूर या गावात नरेगाची ठपका ठेवलेली कामे करण्यात आलेली आहेत. या गावांसह इतर काही गावांत संबंध असलेल्या तब्बल ७५ ग्रामसेवकांना तसेच कोळपिंपरीच्या तीन तर रुईधारूर व उमरेवाडीच्या प्रत्येकी दोन सरपंचांचा यात समावेश आहे.