बीड : केज तालुक्यातील सारूळ येथील सामाजिक सभागृह प्रकरणात आता कार्यकारी अभियंताच अडचणीत आले आहेत. जागा व कामात कसलीही सुसूत्रता नसताना १८ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावली असून १८ लाख रुपये निधी वसूल करण्याच्या सूचना केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सारूळ येथे खा. रामदास आठवले यांच्या खासदार फंडातून सभागृह उभारणीसाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यासाठी रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठाणने सारूळ येथील सर्व्हे नं.२१ ई मध्ये जागा दाखविली. याच जागेत सभागृह उभारल्याचे सांगत जवळपास १८ लाख ७१ हजार रुपयांचा निधी उचलला. जागेबाबत कसलीही सुसूत्रता नसतानाही बांधकाम विभागाने निधी दिल्यानंतर विडा येथील पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे यांनी तक्रार केली होती. यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीही केली. त्यांचा व बांधकाम विभागाच्या अहवालातही जागा बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. हाच धागा पकडून जिल्हाधिकारी यांनी कार्यकारी अभियंता यांना मंगळवारी नोटीस बजावली आहे. यात त्यांनी वितरित केलेला १८ लाख रुपयांचा निधी वसूल करण्याच्याही सूचना केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वर्क ऑर्डर करताना हजर, निधी देताना सुट्टीवर
या सभागृहाच्या कामाच्या जागेबाबत निश्चिती नव्हती. त्यामुळे केज उपविभागाकडून आपण खुलासा मागविला आहे. या कामाची वर्कऑर्डर मीच दिली आहे, परंतु निधी वितरित करताना मी सुटीवर होतो, असे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम हाळीकर यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकारात गोंधळ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
कोट
सारूळ सभागृह प्रकरणात अधिकाऱ्यांना हाताशी धरून निधी हडपला आहे. यात जोपर्यंत न्याय मिळून संबंधितांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील.
पिंटू ठोंबरे, सदस्य पंचायत समिती, केज