परळी वीजवितरण कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 04:51 PM2018-05-14T16:51:57+5:302018-05-14T16:51:57+5:30
येथील वीज वितरण कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह शाखा अभियंत्यांची चार पदे रिक्त आहेत.
परळी (बीड) : येथील वीज वितरण कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह शाखा अभियंत्यांची चार पदे रिक्त आहेत. यामुळे वीज वितरण कंपनीच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे ग्राहकांची ससेहोलपट होत आहे. शाखा अभियंता व जन मिञांची रिक्त पदे न भरल्याने ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
परळी तालुक्यातील धर्मापुरी, सिरसाळा, ग्रामीण-१ , अर्बन- २ येथील शाखा अभियंता पद रिक्त आहेत. या रिक्त पदाचा कारभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. मागील एका वर्षापासून ही स्थिती आहे. तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त असल्याने अंबाजोगाईच्या मंगेश केंद्रे यांच्याकडे अतिरिक्त कारभार आहे. वीज वितरण कार्यालयात अधिकारी नसल्याने कामाचा खेळखंडोबा होत आहे. लातूरच्या मुख्य अभियंता परळीच्या दौऱ्यावर असतांना हा विषय छेडला असता त्यांनी यावर भाष्य केले नाही. तसेच इतर वरिष्ठ अधिकारी ही तोंडावर बोट ठेवतात. त्यामुळे ही पदे भरल्या जात नाहीत. वरिष्ठ कार्यालयाकडे रिक्त पदे भरण्याचा पाठपुरावा चालू असल्याचे समजते परंतु प्रत्यक्षात माञ कार्यवाही होत नाही.
५० गावांसाठी केवळ ८ कर्मचारी
सिरसाळा शाखेत ५० गावे असून केवळ ८ कर्मचाऱ्यांवरच कामकाज चालू आहे. सिरसाळा गावात १ दिवसा व १ राञीसाठी असे 2 कर्मचारी आहेत. सिरसाळा शाखा अंतर्गत जनमिञांची संख्या कमी आहे. या शाखेला शाखा अभियंता ही नाही.
ग्रामीण-2 मध्ये केवळ 4 जनमिञ आहेत. या शाखांतर्गत गावात नाथ्रा, लिंबोटा, दाऊतपूर, भोपला, वागबेट, बेलंबा, पांगरी, संगम, लोणारवाडी, कौठळी, इंदपवाडी,जिरेवाडी, कन्हेरवाडी, दगडवाडी, लोणी, सेलु, वसंतनगर, धारावती तांडा, चंादापूर, मलकापूर, नंदागौळ, परचुंडी, तडोळी यासह अन्य गावाचा समावेश आहे. या ठिकाणी वीज वितरणचे कामे कर्मचाऱ्याअभावी वेळेवर होत नाहीत. यामुळे वीज बंद झाल्यास परत उपलब्ध होण्यास वेळ लागतो. वीजबिले वेळेवर मिळत नाहीत. तसेच वीज दुरूस्तीची कामे होण्यास विलंब लागतो. वीज साहित्याचा अभाव, वीजबिले वेळेवर न येणे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे.