बीड : जनसामान्यांपर्यंत योग्य पोषण हा विषय पोहचविण्यासाठी १ सप्टेंबरपासून महिनाभर प्रत्येक घर पोषण उत्सव राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात मंगळवारी राज्याच्या मुख्य सचिवांनी सबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच या विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली असून ‘सही पोषण, देश रोशन’ या थीमवर हे अभियान राबविण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार हा उपक्रम होत आहे. ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून पोषण अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानासाठी आठवडानिहाय कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांतून बालकांचे चांगले पोषण व्हावे यादृष्टीने मार्गदर्शन तसेच जनजागरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पहिला आठवडा : विशेष ग्रामसभा, माहिती व प्रसिद्धी साहित्य वाटप, प्रभातफेरी, पोषण विषयावर शाळेत चित्रफीत दाखविणे, ० ते ६ वयोगटातील बालकांचे वजन घेऊन छाननी करणे, जिल्हा आणि विभागीय स्तरावर कृती आराखडा, शाळांमध्ये योग्य आहार सेवन करण्याबाबत मार्गदर्शन, ग्रामस्तरवार बेटी आणि बेटा यांची आकडेवारी दर्शविणारा फलक लावणे, बेटी बचाओ, बेटी पढाओ कृती आराखडा, महिला ई शक्ती कार्यक्रम
दुसरा आठवडा : ग्रामआरोग्य स्वच्छता पोषण दिवसमहिलांसाठी योगा, चांगल्या आरोग्यच्या सवयीबाबत लोकजागृती करण्यासाठी गृहभेट, ० ते ६ वयोगटातील बालकांचे वजन आणि छाननी, अंभणवाडी केंद्र, इमारतीतील शौचालयासाठी पाणी सुविधा उपलब्ध करणे, शाळांमध्ये हात धुऱ्याकरिता वॉश बेसिन सुविधा उपलब्ध करणे, सॅनिटरी नॅपकीन व्हेंडींग मशिन ुपलब्ध करुन देणे, अस्मिता योजनेंतर्गत पॅडचा पुरवठा करणे, गट, ग्रामस्तरावर कृती आराखडा, बेटी बचाओ, बेटी पढाओ, पात्र महिलांना कल्याणकारी योजनांचा लाभ देणे
तिसरा आठवडा : जिल्हा, विभागीय स्तरावर पोषण मेळावे, , प्रदर्शन, सदृढ बालक स्पर्धा, विविध फळांच्या पोशाखासह बालकांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पथनाट्य, शालेय निबंध स्पर्धा, रक्तक्षय मुक्त भारत, बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर जनजागरण तसे ग्राम बालविकास केंद्रांचे आयोजन
चवथा आठवडा : समुदाय आधारित कार्यक्रम, प्रभातफेरी, लोकजागृतीसाठी आरोग्य कर्मचारी, बचत गटांच्या प्रतिनिधींच्या गृहभेटी, बालकांचे वजन, छाननी, किशोरवयीन मुलींसाठी जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
माझी कन्या भाग्यश्रीचे ५९ लाभार्थी१ आॅगस्ट २०१७ पासून सुरू झालेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत बीड जिल्ह्यात ५९ लाभार्थी असून आतापर्यंत २० लाभार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनाकर्ष वाटप करण्यात आला. या योजनेंतर्गत दोन मुली असतील तर दोघींना प्रत्येकी २५ हजार आणि एक मुलगी असेल तर ५० हजार रूपये शासनामार्फत दिले जातात.
९४ बालकांची प्रकृती सुधारलीबीड जिल्ह्यात ० ते ६ वर्ष वयोगटात २ लाख १४ हजार ४०८ मुले- मुली आहेत. जिल्ह्यात २०६ अतितीव्र कुपोषित बालक आहेत. त्यापैकी ९४ बालकांची ग्राम बालविकास केंद्रात सुधारणा झाल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग) चंद्रशेखर केकाण यांनी सांगितले.