माजलगावं धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:15 PM2018-05-09T19:15:02+5:302018-05-09T19:15:02+5:30
वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माजलगांव धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. सध्या माजलगांव धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
माजलगांव (बीड ) : वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माजलगांव धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. सध्या माजलगांव धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उन्हाळ्याचा आणखी एक महिना शिल्लक असल्याने प्रशासनाकडुन धरणातील साठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याची तयारी सुरु झाली आहे.
गेल्यावर्षी परतीच्या पावसामुळे माजलगांव धरण हे १०० टक्के भरले होते यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे परिसरात मोठया प्रमाणावर उसाची लागवड झाली. त्यासाठी व इतर पिकांसाठी माजलगांव धरणातुन पाच पाणीपाळया देण्यात आल्या. यात खरीपासाठी एक तर रब्बीसाठी चार पाळया देण्यात आल्या. उन्हाळी पाळया आता पर्यंत 3 देण्यात आल्या असुन अजुन एक पाळी देणे बाकी आहे. धरणाच्या बॅक वाॅटरवरुन बीड शहर, माजलगांव शहर व इतर आजुबाजुचे खेडेपाडयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच धरणातुन अनेक शेतक-यांनी पाईपलाईनद्वारे आपल्या शेतीसाठी पाणी घेतलेले आहे. यातील ९० टक्के शेतक-यांनी कसल्याही प्रकारचा परवाना न घेता पाणी उपसा सुरु ठेवलेला आहे.
४ मिटरने खालावली पातळी
माजलगांव धरणाची एकुण पाणसाठयाची क्षमता ही ४३१.८० मिटर एवढी आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत ही पाणी पातळी ४२७.६० मिटरवर आली आहे. धरणाची पातळी ४ मिटरपेक्षा जास्त खालावली आहे. धरणामध्ये एकुण साठा २०६.२० द.ल.घ.मि. असुन पैकी जिवंत साठा हा ६४. २० द.ल.घ.मी. म्हणजेच १८. ५९ टक्के इतका राहिलेला आहे. माजलगांव धरणातुन दररोज ०.५३५ द.ल.घ.मी. येवढे पाणी पिण्यासाठी तसेच बाष्पीभवनामुळे उत्सर्जीत होत आहे.
एकंदरीत माजलगांव धरणातील पाणी साठयाची उपलब्धता पाहता भविष्यात शेतक-यांना एक उन्हाळी पाळी दिल्यास जिवंत पाणीसाठयामध्ये मोठी घट होणार असुन प्रशासकिय पातळीवर पाणीपाळी द्यावी किंवा नाही या बाबत विचारविनिमय होत आहे. मात्र पावसाळा सुरु होण्यासाठी अजुनही एक महिन्याचा कालावधी असल्यामुळे पाणी पाळी शेतक-यांना न दिल्यास त्यांचे देखील मोठे नुकसान होणार असल्याचे दिसुन येते.
पाणी जाऊन वापरावे
माजलगांव धरणातील पाणी साठा हा पुरेसा असला तरी नागरीकांनी व शेतक-यांनी पाण्याचा वापर हा जपुन केल्यास भविष्यात पाण्यासाठी अडचणी होणार नाहीत.
- राजेंद्र दहातोंडे, धरण अभियंता