परळीत 'ओन्ली डीएम'चा नारा; धनंजय मुंडेंचा तब्बल १ लाख ४० हजार मतांनी ऐतिहासिक विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 05:18 PM2024-11-23T17:18:09+5:302024-11-23T17:18:43+5:30
भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी भावाला साथ देत प्रथमच परळी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळासाठी मते मागितले.
परळी: मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात तब्बल १ लाख ४० हजार २२४ पेक्षा अधिक मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केला. यामुळेच मुंडे यांचे कार्यकर्ते, परळीत 'ओन्ली डीएम' असा नारा देत जल्लोष करत आहेत.
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत राहिले. यामुळे शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्या पराभवासाठी मोर्चेबांधणी केली. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देखमुख यांना पक्षात घेत तिकीट दिले. यामुळे मतदारसंघात पवार विरुद्ध पवार ही लढत मराठा विरुद्ध ओबीसी अशी झाली. दरम्यान, लोकसभेला भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा जरांगे फॅक्टर मुळे पराभव झाल्याने धनंजय मुंडे यांच्यासमोर मतांची जातीय विभागणी टाळण्याचे आव्हान होते.
दरम्यान, भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी भावाला साथ देत प्रथमच परळी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळासाठी मते मागितले. स्वतः धनंजय मुंडे यांची यंत्रणा, त्याला भाजपा आणि महायुतीच्या मित्र पक्षांची जोड मिळाल्याने परळीचा गड सहज शक्य झाला. निर्णायक आघाडी घेतलेल्यानंतर मुंडे यांनी देखील जनतेने निवडणूक हाती घेऊन विजय साकार केल्याची प्रतिक्रिया दिली.
देशमुख यांना पडली फक्त ५४ हजार मते
परळी विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 40 हजार 224 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे उमेदवार , कृषिमंत्री धनंजय मुंडे विजयी, प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीचे श्री राजेसाहेब देशमुख यांना 54 हजार 665 मते मिळाली तर धनंजय मुंडे यांना 1लाख 94 हजार 889 मध्ये मिळाली आहेत.