अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात शासकीय सेवेत असून ही खाजगी रूग्णालयात आरोग्य सेवा देणार्या डॉक्टरांची चौकशी करून त्यांचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवावा असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले. तसेच रूग्णांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही याची खबरदारी घ्या असे आदेश ही त्यांनी दिले.
अंबाजोगाईत आयोजित पत्रकार परिषदेत आमित देशमुख पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयाला 750 खाटांची मान्यता मंजुर करण्यात आली आहे. तसेच ग्रंथालय, पाकशाळा, अतिदक्षता विभाग व बांधकामे यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देवू असे आश्वासन त्यांनी दिले. अंबाजोगाईत डॉक्टर व इतर अनेक पदे रिक्त आहेत. ही रिक्तेपदे भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आठ हजार प दे भरण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला परवानगी दिल्याने ही पदे भरली जाणार आहेत असे त्यांनी सांगितले. तसेच हंगामी कर्मचार्यांचे समायोजन कसे होईल याकडे ही लक्ष दिले जाईल.
बीड व अंबाजोगाई येथे प्लॉझमा बँकींग सुरू करण्यात येणार आहे. तर बीडच्या जिल्हा रूग्णालयात विषाणू संसर्ग चाचणी प्रयोग शाळा सुरू करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अंबाजोगाईच्या रूग्णालयात पॅथॉलोजी लॅबअसताना अनेक तपासण्या बाहेरून कराव्या लागतात. याचा मोठा आर्थिक भुर्दंड रूग्णांना होतो. यावर लक्ष केंद्रित केले असता रूग्णांचा होणारा आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने खबरदारी बाळगावी असे आदेश त्यांनी दिले. अंबाजोगाईचे स्वाराती रूग्णालय अत्याधुनिक सुविधांनी उपलब्ध करून सामान्य रूग्णांना अत्याधुनिक सेवा व उपचार पद्धती उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययायेजना येत्या वर्षभरात पुर्ण करून हे रूग्णालय सुसज्ज करू असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
कोरोनाच्या काळात सर्व डॉक्टर, कर्मचार्यांनी आपला जीव धोक्यात घालून तमा न बाळगता कर्तव्य तत्परतेने बजावल्याबद्दल त्यांनी सर्व कर्मचार्यांचे स्वागत केले. या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी राहुल रेखावर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार, आ.संजय दौंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे, बबन लोमटे, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तहसीलदार संतोष रूईकर यांची उपस्थिती होती.