विरोधकांनी दिलेल्या दुःखाची व्याजासह परतफेड करू : पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 04:29 PM2019-06-03T16:29:14+5:302019-06-03T16:30:13+5:30
पुढच्या वेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री
गोपीनाथ गड (बीड ) : जातीपातीचे गलिच्छ राजकारण करून सर्वाना दुख: देणाऱ्या विरोधकांना याची व्याजासह परतफेड करू असा इशारा एक उर्दू शेर सादर करून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गड येथे विरोधकांना दिला. यासोबतच मतदारांनी जातीपातीचे राजकारण मोडीत काढले असून पुढच्या वेळेस महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील असा विश्वाससुद्धा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
परळी, तालुक्यातील पांगरी येथील गोपिनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनी समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच चाहत्यांची गर्दी झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गोपीनाथगडावर रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यातील युतीच्या खासदारांचे स्वागत केले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांचे नाव जगाला विसरू देणार नाही. सामान्यांची वंचितांची सतत मदत करत राहणार. गोपीनाथ गड हा सर्वांना उर्जा देत आहे, सर्वांचे प्रेरणास्थान बनला आहे असेही त्या म्हणाल्या.
पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री
गलिच्छ राजकारण करून आम्हाला विनाकारण दु: ख देण्यात आले. घरात त्रास झाला, बाहेर त्रास झाला,जिल्ह्यात त्रास झाला. मात्र जनतेने जातीपातीच्या गलिच्छ राजकरणाला थारा दिला नाही. आता सर्व सामान्यांच्या सोबतीने दु: ख देणाऱ्यांना व्याजासह याची परतफेड करू असा इशारा मुंडे यांनी दिला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच नंतरही मुख्यमंत्री होतील. यासाठी माझा खारीचा वाटा असेल अशी ग्वाही सुद्धा मुंडे यांनी दिली.