परळीत धनंजय मुंडे यांनी आघाडी टिकवली; शरद पवार गटाचे राजसाहेब देशमुख पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:56 AM2024-11-23T10:56:25+5:302024-11-23T11:02:46+5:30
परळी विधानसभा मतदार संघ हा मुंडे यांचा गड मानल्या जातो.
- संजय खाकरे
परळी : राज्याचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे नेते, महायुतीचे उमेदवार कृषी मंत्री धनंजय मुंडे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. धनंजय मुंडे 8 व्या फेरी मध्ये 41 हजार 48 मतांनी आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे पिछाडीवर आहेत.
पहिल्या फेरीमध्ये धनंजय मुंडे हे 6199 मते घेऊन आघाडीवर घेतली होती. तर राजेसाहेब देशमुख यांना 2771 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरी अखेर 3428 मतांनी धनंजय मुंडे पुढे आहेत. त्यानंतर आघाडी कायम ठेवत आठव्या फेरीअखेर आघाडी कायम ठेवली आहे.
परळी चे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी सकाळी 9:30 वाजता पहिल्या फेरी अखेर धनंजय मुंडे आघाडीवर असल्याची घोषणा केली आहे. शनिवारी येथील शक्ती कुंज वसाहतीतील क्लब बिल्डिंगमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. सकाळी आठ वाजता पोस्टल मतांची मतमोजणी सुरू करण्यात आली. या मतमोजणी मध्ये धनंजय मुंडे आघाडीवर आहेत तसेच 14 टेबलवर मतमोजणी सुरुवात करण्यात आली. पहिली फेरी व दुसऱ्या फेरीमध्ये धनंजय मुंडे आघाडीवर राहिले आहेत.
परळी विधानसभा मतदार संघ हा मुंडे यांचा गड मानल्या जातो. परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या शक्ती कुंज वसाहतीतील क्लब बिल्डींग मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांच्या उपस्थितीत मतमोजणी चालू आहे. या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तेजस्विनी जाधव, व्यंकटेश मुंडे, त्रिंबक कांबळे हे काम पाहत आहेत. अंबाजोगाईच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. मतदान मोजणी स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे येथील नेते वाल्मीक कराड, अजय मुंडे, बाजीराव धर्माधिकारी , सचिन मुंडे , भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे , प्रा पवन मुंडे तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख , बहुजन विकास आघाडीचे उमेदवार डी एल उजगरे व इतर कार्यकर्ते उपस्थित आहेत.