परळी: मुंडे कुटुंबाचा गड असलेल्या परळी विधानसभेत मंत्री धनंजय मुंडे निर्णायक आघाडी घेतली आहे. 18 व्या फेरीअखेर तब्बल 1 लाख 19 हजाराची आघाडी घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांना मागे फेकले आहे. मुंडे यांच्या विजयी वाटचाल सुरू होताच परळीत जल्लोष सुरू झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा जरांगे फॅक्टरने पराभव झाल्याचे बोलले जाते. यामुळेच परळीत मराठा-ओबीसी अशी लढत झाल्यास कोण विजयी होणार याकडे लक्ष होते. दरम्यान, गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे अशी लढत बघायला मिळाली होती. मात्र, महायुतीमध्ये ही जागा धनंजय मुंडे यांच्याकडे गेली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. तर पंकजा मुंडे स्वत: धनंजय मुंडेंचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या. याचे परिणाम आता दिसत असून धनंजय मुंडे यांनी 18 व्या फेरीअखेर तब्बल 1 लाख 19 हजार मतांची लिड घेतली आहे.