केज : तालुक्यातील एका प्रवाशासोबत केलेले गैरवर्तन कळंब आगाराच्या एका महिला वाहकाच्या अंगलट आले. वाहकावरील दोषारोप सिद्ध झाल्याने आगार प्रमुख यांनी त्या वाहकास तिच्या मूळ पगाराच्या एक दशांश दंड आकारला आहे.६ सप्टेंबर २०१८ रोजी साळेगाव येथून केजला जाणाऱ्या रत्नाकर दिलीप राऊत या प्रवाशाला कळंब - केज बसच्या वाहक शिंदे (क्र.२०१६६) यांनी कर्तव्यावर असताना धक्काबुक्की केली. तसेच त्याच्या श्रीमुखात भडकावली होती. या प्रकरणी प्रवाशाने तक्रार केली होती. त्यानुसार आगार प्रमुख कुलकर्णी यांनी चौकशी केली. त्यामध्ये कागदोपत्री पुरावा, घटनास्थळी तक्रारदार व गैरअर्जदार यांचा जवाब आणि इतर परिस्थिजन्य पुराव्यावरुन वाहक शिंदे यांच्यावर दोषारोप सिद्ध झाला.आगार प्रमुख कुलकर्णी यांनी एका आदेशान्वये मूळ पगाराच्या एक दशांश म्हणजेच ११७९ रुपये दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम वाहकाच्या मूळ वेतनातून वसूल करण्याचे आदेशित केले. तसेच यापुढे अशी पुनरावृत्ती झाल्यास गंभीर दखल घेतली जाईल अशीही ताकीद सदर वाहकास देण्यात आली आहे.प्रवासी राऊत यांनी त्यांच्या तक्रारीवर काय कारवाई झाली, याबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती घेतली होती. त्यानुसार ही कारवाई झाल्याचे समोर आले. या दंडात्मक कारवाईमुळे बसमध्ये प्रवास करणाºया प्रवाशांसोबत गैरवर्तन करण्याचे धाडस राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी करणार नाहीत.
महिला वाहकाला ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:48 AM