शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था
बीड : बीड बायपासचे काम पूर्णत्वास जाऊन दोन वर्षे उलटून गेलेली असताना शहरवासियांना लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. बीड शहरातून जाणारा मुख्य रस्ता काम होणे अपेक्षित असताना याकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा असल्याचे दिसते. दर्जेदार रस्ते करून वाहनधारक, नागरिकांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
पेठ भागात अवैध गतिरोधकांमुळे त्रास
बीड : शहरातील पेठ भागात गल्लीबोळात तयार केलेल्या अवैध गतिरोधकांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वाहने आदळून नुकसान होते, तसेच अपघाताचा धोका संभवतो.
पिकांवर आले रोगराईचे संकट
अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या एक आठवड्यापासून दररोज ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, या पिकांना रोगराईचा फटका बसू लागला आहे. वातावरणातील बदलाचा शेतकऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे. वातावरणात असे बदल झाल्यानंतर शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके पिकांवर फवारावी लागतात.
शेतकरी त्रस्त
अंबाजोगाई : तालुक्यात शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होऊ लागल्याने विद्युत पंप सुस्थितीत चालत नाहीत. ते सतत बंद पडत आहेत.
नियमांची एैशीतैसी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होतेय.
काटेरी झुडपांचा त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० किमी रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.
सिग्नल सुरू करा
बीड : शहरातील मुख्य चौकात असलेली सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ही सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे अनेकवेळा वाहनधारक, नागरिकांतून सुरू करण्याची मागणी होती, परंतु याची दुरूस्ती झालेली नाही.
पर्यावरण धोक्यात
अंबाजोगाई : शहर परिसरात वीटभट्ट्या आहेत. परवानगी नसतानाही भट्ट्या सुरू आहेत. प्रदूषण निर्माण करणाऱ्या या वीटभट्ट्यांवर कारवाईची मागणी होत आहे.