पॉवरग्रीड मधील कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 02:41 PM2020-09-11T14:41:31+5:302020-09-11T14:44:26+5:30
दुर्घटनेसाठी पॉवरग्रीडचा हलगर्जीपणा कारणीभूत असून काम सुरु असताना विद्युत पुरवठा कोणी सुरु केला याचा शोध घेण्यात येऊन दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
अंबाजोगाई : येथून जवळच असलेल्या शेपवाडी पॉवरग्रीड मधील कर्मचाऱ्याचा विजेच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१०) दुपारी पावणेदोन वाजता घडली. परवानगी घेऊन बंद केलेला विद्युत प्रवाह अचानक सुरु केल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी केला आहे. यासाठी जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन रोखले आहे.
राजपाल आनंदराव गरड (वय ३५, रा. रानमसले, ता. सोलापूर) असे त्या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजपाल हे पावरग्रीडमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत. गुरुवारी दुपारी एका तांत्रिक बिघाडानंतर त्यांनी परवानगी घेऊन विद्युत पुरवठा बंद केला आणि दुरुस्तीचे काम सुरु केले. या दरम्यान पुन्हा अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने त्यांना विजेचा जोरदार झटका बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गरड यांच्या नातेवाईकांनी अंबाजोगाईकडे धाव घेतली. राजपाल यांच्या अपघाती मृत्यूबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला आहे. मयत तंत्रज्ञ राजपाल गरड यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखले :
दरम्यान, या दुर्घटनेसाठी पॉवरग्रीडचा हलगर्जीपणा कारणीभूत असून काम सुरु असताना विद्युत पुरवठा कोणी सुरु केला याचा शोध घेण्यात येऊन दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. राजपाल यांच्यावर पाच जणांचे कुटुंब अवलंबून होते. त्यांच्या मृत्यूनंतर हे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे कुटुंबातील एका व्यक्तीला पॉवरग्रीडमध्ये नोकरी देण्याची लिखित शाश्वती द्यावी तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार :
या दुर्घटनेबाबत माहिती घेण्यासाठी शेपवाडी पॉवरग्रीडचे डीजीएम निलेश ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया अथवा देण्यास नकार दिला. एकंदरीतच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुप्पीमुळे या दुर्घटनेबाबतचा संशय वाढत आहे.