प्रकाश सोळंकेंनी गड राखला; चुरशीच्या लढतीत शरद पवार गटाच्या मोहन जगतापांचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 04:48 PM2024-11-23T16:48:27+5:302024-11-23T16:48:57+5:30
विशेष म्हणजे, पहिल्या फेरीपासून पंधराव्या फेरीपर्यंत मोहन जगताप आघाडीवर होते.
माजलगाव: राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी चुरसीच्या लढतीत आपला गड राखला आहे. त्यांनी शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार मोहन जगताप यांचा ५ हजार ८७१ मताने पराभव केला. विशेष म्हणजे, पहिल्या फेरीपासून पंधराव्या फेरीपर्यंत मोहन जगताप आघाडीवर होते. त्यानंतर १६ व्या फेरीपासून अखेरच्या २९ व्या फेरीपर्यंत सलग आघाडी घेत प्रकाश सोळंके यांनी हा विजय प्राप्त केला.
पुतण्याला उमेदवारी द्यावी मी लढणार नाही असे जाहीर केल्यानंतर ही पक्षाने प्रकाश सोळंके यांनाच उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाने भाजपातून आलेल्या मोहन जगताप यांना उमेदवारी दिली. या सोळंके आणि जगताप अशी थेट लढत होत असताना अपक्ष रमेश आडसकर, माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे यांनी देखील चुरस वाढवली. अपक्ष उमेदवार किती मते घेतात यावर सोळंके आणि जगताप यांच्या विजयाचे चित्र अवलंबून होते अशी शक्यता मतमोजणी आधी वर्तविण्यात आली. मात्र, शेवटी सोळंके आणि जगताप या दोघांतच शेवटच्या फेरीपर्यंत लढत झाली. पहिल्या फेरीपासून पंधराव्या फेरीपर्यंत मोहन जगताप आघाडीवर होते. त्यानंतर १६ व्या फेरीपासून अखेरच्या २९ व्या फेरीपर्यंत सलग आघाडी घेत प्रकाश सोळंके यांनी विजय मिळवला. तर त्यांच्या विरोधात मागील निवडणूक भाजपाकडून लढलेले अपक्ष उमेदवार रमेश आडसकर हे तिसऱ्या स्थानी राहिले.
अशी मिळाली मते :
प्रकाश सोळंके - 66 हजार 211
मोहण जगताप -61 हजार 007
बाबरी मुंडे -17 हजार 395
माधव निर्मळ -33 हजार 799
रमेश आडसकर -37 हजार 168
अनेक अडथळे पार करत मिळवला विजय
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे रमेश आडसकर यांच्या उमेदवारीमुळे विजय मिळवणे जड जात होते. त्यामुळे प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघात प्रत्येक सभेदरम्यान ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत निवडून देण्याचे भावनिक आवाहन केले होते. यामुळे सोळंके यांना सहानुभूती मिळाली होती. तरीही नवखे रमेश आडसकर यांनी चांगली लढत दिली. केवळ ११ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतरही गत पाच वर्षांत एकही दिवस मतदारसंघ सोडला नाही व कायम जनतेच्या संपर्कात राहिले. मात्र, अजित पवार राष्ट्रवादीने भाजपसोबत महायुतीमध्ये प्रवेश केल्याने आडसकर यांचा पत्ता कट झाला. यामुळे आडसकर यांनी ऐनवेळी भाजपा सोडून शरद पवार गटात प्रवेश केला. मात्र, त्यांना तिकीट नाकारून शरद पवार गटाने भाजपमधून आलेलेचे मोहन जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आडसकर यांनी बंडखोरी केली. दुसरीकडे अजित पवार गटाचे माधव निर्मळ, भाजपचे बाबरी मुंडे यांनी देखील बंडखोरी केली. यातच वंचितने मुस्लिम उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस वाढली होती.