बीड - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून 16 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. या 16 उमेदवारांपैकी 14 उमेदवार हे विद्यमान खासदार असून दोन नवख्या उमेदवारांना संधी मिळाली आहे. त्यापैकी बीडमधून प्रितम मुंडे यांचीही उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून भाजपाने राष्ट्रवादीला 'प्रितमच पुन्हा' असल्याचे ठामपणे सांगितलं आहे.
बीडमधून भाजपाच्या विद्यमान खासदार आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंच्या भगिनी डॉ. प्रितम मुंडे यांना यांच तिकीट फायनल करण्यात आलं आहे. गोपीनाथ कन्या प्रितम मुंडे यांना राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांचे आव्हान असणार आहे. प्रितम मुंडेंची कामगिरी निराशाजनक असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभा राहिले होते. मात्र, पंकजा मुंडेंची मतदारसंघातील पकड आणि त्यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याला मिळालेला निधी, विकासकामे आणि मुंडेंचा वारस लक्षात घेऊन भाजपाने बीडमध्ये प्रितमच पुन्हा असे म्हटले आहे.
'डॉक्टर विरुद्ध इंजिनिअर', जाणून घ्या मुंडेंविरुद्ध लढणारे सोनवणे कोण ?
प्रितम मुंडेंच्या विरोधात लढण्यासाठी अमरसिंह पंडित यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीने सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली. सोनवणे हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असून त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. यापूर्वी सोनवणे यांनी जि.प.चे शिक्षण आणि आरोग्य सभापतीपद भूषिवले असून येडेश्वरी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. धनंजय मुंडे यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना हटवून सोनवणे यांना जिल्हाध्यक्ष केले आहे. त्यामुळे बीडमधील आगामी लोकसभा निवडणूक ही मुंडे विरुद्ध सोनवणे अशीच रंगणार आहे. दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पोटनिवडणुकीत प्रितम मुंडे खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. सर्वाधिक मताधिक्याने निवडणूक येण्याचा विक्रम खासदार प्रितम मुंडे यांच्या नावावर आहे.