प्रितम मुंडे यांनी केली पिक नुकसानीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 02:12 PM2020-10-01T14:12:41+5:302020-10-01T14:13:19+5:30
मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम १०० टक्के वाया गेला आहे. त्याच्या पाहणीसाठी जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे संसदेचे अधिवेशन संपताच गुरूवार दि. १ रोजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आल्या.
बीड : मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम १०० टक्के वाया गेला आहे. त्याच्या पाहणीसाठी जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे संसदेचे अधिवेशन संपताच गुरूवार दि. १ रोजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आल्या. खरीप पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
पंधरा दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस ही पिके शंभर टक्के वाया गेली आहेत. अद्यापपर्यंत पंचनामे सुरू झालेले नाहीत. जिल्ह्यातील सत्ताधारी शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठीही गेलेले नाहीत. या पार्श्वभुमीवर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची केलेली पाहणी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली.
कोरोना संकटात पिकांचे नुकसान हे एक फार मोठे दुहेरी संकट असून आता सरकारने शेतकऱ्यांचे दुःख ओळखावे आणि कुठल्याही परिस्थितीत हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी, असे डॉ. मुंडे यांनी यावेळी नमूद केले. या दौऱ्यात भाजपा नेते रमेश आडसकर यांच्यासह सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.