बीड जिल्ह्यात केंद्रांवर तूर खरेदी पुन्हा बंद: दोन वेळा मुदतवाढ तरीही ११ हजार शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:31 PM2018-05-15T23:31:37+5:302018-05-15T23:31:37+5:30
तूर खरेदीला पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी शेतक-यांतून जोर धरत आहे. या मागणीचा विचार करुन तातडीने निर्णय अपेक्षित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : हमीदराने तूर खरेदीचा ढोल बडवणाऱ्या शासनाचे दुर्लक्ष आणि नाफेडच्या दुर्लक्षतेमुळे तूर खरेदीत वारंवार अडथळे येत आहेत. १८ एप्रिलनंतर पाच दिवसांचा खंड देवून पुन्हा १५ मे पर्यंत तूर खरेदीचे आदेश देण्यात आले. परंतु वास्तविक परिस्थिती काय आहे, याचे भान न ठेवता केवळ आदेश बजावण्याचे काम झाल्याने दिलेल्या मुदतीत नोंदणी केलेल्या शेतक-यांची तूर खरेदी झालेली नाही. त्यामुळे तूर खरेदीला पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी शेतक-यांतून जोर धरत आहे. या मागणीचा विचार करुन तातडीने निर्णय अपेक्षित आहे.
१ फेब्रुवारीपासून हमीदराने तूर खरेदीसाठी नाफेडच्या वतीने मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात केंद्र सुरु केले होते. १४ केंद्रांवर १३४ दिवसांत २ लाख १४ हजार ३८८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तरीही नोंदणी केलेल्या व तूर न विकलेल्या शेतकºयांची अद्यापही मोठी संख्या आहे. तूर खरेदीपासून नियोजनाचा अभाव असल्याने गोदाम उपलब्ध झाले नाही. त्यामुळे खरेदी केलेली तूर साठविण्याचा प्रश्न वारंवार निर्माण झाला. वखार महामंडळाकडूनही गोदाम उपलब्ध झाले नाही. मागील वर्षीची तूर गोदामातून बाहेर काढण्यात शासन यंत्रणेला अपयश आले. त्यामुळे गोदामांचा प्रश्न कायम राहिला.
एकीकडे गोदामाचा प्रश्न असताना दुसरीकडे खरेदी केलेली तूर भरण्यासाठी नाफेडकडून बारदाण्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे अनेकवेळा काही कालावधीसाठी तूर खरेदी बंद ठेवण्याची वेळ केंद्र चालकांवर आली. परिणामी शेतकºयांना ताटकळावे लागले.
गोदाम उपलब्ध करुन द्यावे तसेच बारदाणा पुरवठा सुरळीत करावा यासाठी शासन व नाफेडकडे पाठपुरावा करण्यात एक- दोन लोकप्रतिनिधी वगळता इतरांनी दुर्लक्षच केल्याचे दिसते. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य आधारेखित झाले नाही. आता १५ मेच्या रात्री बारा वाजेनंतर तूर खरेदी बंद होणार आहे. त्यामुळे वंचित शेतकºयांच्या तूर खरेदीचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नोंदणी केलेल्या जवळपास ११ हजार शेतकºयांची तूर खरेदी होणार की नाही याबद्दल यंत्रणेतील कोणीही बोलायला तयार नाहीत. यामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त दिसू लागला आहे.
एक लाख क्विंटल तूर पडून
खरेदी झालेली तूर नाफेडच्या बारदाण्यातून रितसर गोदामात पोहोच झाली तरच या तुरीचे शेतकºयांना पेमेंट मिळणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांवर पडून असलेली तूर साठविण्यासाठी गोदामांची उपलब्धता करणे गरजेचे आहे. सध्या वातावरणात बदल होत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१८ एप्रिलपर्यंतची नोंदणी
बीड जिल्ह्यात १८ एप्रिलपर्यंत ३२ हजार ५१९ शेतक-यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली.
तसेच मुदत संपल्याने अनेकांना नोंदणी करता आली नाही.
२ लाख क्विंटल खरेदी
१४ मेपर्यंत जिल्ह्यातील २१ हजार २२७ शेतकºयांची २ लाख १४ हजार ३८८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यापैकी पुणतांबा, पैठण, फलटण, कुडूवाडी, बारामती, बीड, गेवराईच्या गोदामात १ लाख १ हजार ५९० क्वि. तूर पाठविण्यात आली.
यंत्रणेतुनही मुदतवाढीची मागणी
१५ मेपर्यंतच्या एकूण परिस्थितीवरुन नोंदणीपासून वंचित राहिलेले ७ हजार तर नोंदणी झालेले १२ हजार शेतक-यांची तूर खरेदीसाठी व आॅनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी याबाबत जिल्हाधिकारी, नाफेड आणि मार्केटिंग फेडरेशनला कळविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकºयांना निर्णयाची प्रतीक्षा आहे.
बारदाणा संपला
तूर खरेदी केंद्रांना पुरेसा बारदाणा पुरवठा झाला नाही. दोन दिवसांपासून बारदाणा नसल्याने सातपेक्षा जास्त केंद्रांवर तूर खरेदी बंद पडली. तर खरेदी केलेली १ लाख १२ हजार ७९० क्विंटल तूर केंद्रांवर पडून आहे.