जायकोचीवाडी रस्त्याचा प्रश्न रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:34 AM2021-02-16T04:34:47+5:302021-02-16T04:34:47+5:30
माजलगाव : तालुक्यातील जायकोचीवाडी या गावचा रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. जायकोचीवाडी ते खामगाव पंढरपूर डांबरी रस्ता व ...
माजलगाव : तालुक्यातील जायकोचीवाडी या गावचा रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. जायकोचीवाडी ते खामगाव पंढरपूर डांबरी रस्ता व पाणंद रस्ता अत्यंत बिकट झालेला आहे. या रस्त्याच्या समस्येबाबत निवेदनही दिले आहे. मात्र, रस्त्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. परिणामी या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
अवैध प्रवासी वाहतूक
बीड : शहरातील प्रमुख बसस्थानकासमोरच खासगी वाहनधारक सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, हे वाहनधारक चक्क बसस्थानकात येऊन प्रवाशांची पळवापळवी करीत आहेत. तरीही येथील सुरक्षारक्षक व रापमच्या अधिकाऱ्यांकडून यावर कसलीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.
वृक्षतोड थांबवावी
पाटोदा : पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही, अंमळनेर, वैद्यकिन्ही, निरगुडी, नायगाव या परिसरात सर्रासपणे अवैध वृक्षतोड होत असल्याचे दिसत आहे. वनविभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वृक्षमित्रांमधून केला जात आहे. परंतु, अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
स्वच्छतागृहात अस्वच्छता
बीड : शहरात नगरपालिकेकडून स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, अस्वच्छता पसरल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याचा नागरिकांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने लक्ष घालून स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे. परंतु, अद्यापही याकडे लक्ष दिले जात नाही.
विषाणूजन्य आजार
अंबाजोगाई : हवामानातील बदलाने अंबाजोगाई शहर व परिसरात विषाणूजन्य आजाराची साथ पसरत आहे. या साथीमुळे बालके, वयोवृद्ध यांना या साथीचा मोठा त्रास होत आहे. रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढू लागली आहे. सध्याच्या हवामानातील बदलाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
चोरांचा त्रास वाढला
बीड : शहरातील बाजारपेठा सध्या खरेदीसाठी नागरिकांनी गजबजून गेल्या आहेत. याच गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोरटेही सक्रिय झाल्याचे दिसत आहे. कुठे मोबाईल तर कुठे पाकिट तर कुठे सामान चोरीचे प्रकार होत आहेत. चोरांवर अंकुश राहील, नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी आहे.