रामदास आठवलेंनी खासदार निधीतून दिलेला २५ लाखांचा निधी एनजीओने हडपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 06:23 PM2020-09-11T18:23:08+5:302020-09-11T18:28:36+5:30
खा. रामदास आठवले यांच्या खासदार फंडातून सभागृह उभारणीसाठी २५ लाखांचा निधी मंजूर झाला होता.
बीड : केज तालुक्यातील सारूळ येथे रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठानने दुसरेच सभागृह दाखवून २५ लाख रुपयांचा निधी हडपल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे यांनी केली होती. यात त्यांनी जागा सारूळमध्ये अन् सभागृह धावज्याचीवाडीतील दाखविल्याचे म्हटले आहे. याची चौकशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या पथकाने बुधवारी केली.
खा. रामदास आठवले यांच्या खासदार फंडातून सभागृह उभारणीसाठी २५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. यासाठी रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठानने सारूळ येथील सर्वे नं २१ ई मध्ये जागा दाखविली. तेथेच सभागृह उभारल्याचे सांगत २५ लाखांचा निधी उचलला. प्रत्यक्षात सारूळ येथे कसलेही सभागृह नसून २५ लाखांचे कामही झाले नसल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतने दिलेले आहे.
हा निधी उचलण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रम मुंडे यांनी धावज्याचीवाडी येथील खाजगी व्यक्तीचे सभागृह दाखविले आहे. तसेच प्रतिष्ठानकडे कसलाही बोजा नसल्याचे सांगत फसवूणक केली. वास्तविकता त्यांच्याकडे १ कोटी रुपयांचा बोजा आहे. या सर्व प्रकाराबाबत विड्याचे पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे यांनी तक्रार केली होती.