कारखान्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ; संतप्त शेतकऱ्याने बुलेट टाकली थेट उसाच्या गव्हाणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 06:10 PM2024-01-31T18:10:04+5:302024-01-31T18:10:39+5:30
ऊस घेऊन पैसे देण्यास गुळ पावडर कारखान्याची चाल ढकल
माजलगाव: तालुक्यातील रोषणपुरी येथे गुळपावडर उत्पादन करणाऱ्या रूपामाता कारखान्याने शेतकऱ्यांचा ऊस नेला परंतु ते पैसे देण्यास चालढकल करत असल्याने एका शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री स्वतःची बुलेट गव्हाणीत सोडली. यापूर्वीही एका शेतकऱ्याने गव्हाणीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
तालुक्यातील रोशनपुरी येथे गुळ पावडर उत्पादन करणाऱा रूपामाता नावाने कारखाना उभा करण्यात आला. हा कारखाना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना वेळेत पैसे देत नसल्याच्या तक्रारी होत्या. या कारखान्याने शेतकऱ्यांकडुन १५ दिवसाच्या मुदतीवर ऊस घेऊन गेले होते. परंतु दीड ते दोन महिने झाले असताना संबंधित कारखान्याकडून शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळत नाही. यामुळे पंधरा दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने गव्हाणी मध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
तर शिंपेटाकळी येथील लक्ष्मण गवळी याचा या कारखान्यास दिड दोन महिन्यापूर्वी ऊस गेला होता. अनेक वेळा कारखान्याकडे उसाचे बिल मागून देखील कारखान्याकडून बिलासाठी चालढकल केली जात असल्याचा आरोप लक्ष्मण गवळी यांनी केला आहे. त्याचबरोबर संबंधित शेतकऱ्यास सोमवारी पैसे देतो म्हणून एका बँकेत दिवसभर बसवून घेण्यात आले, परंतु त्यास पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आज गवळी यांनी कारखान्यात येत पैशांची मागणी करत बुलेट गाडी थेट उसचा रस काढण्यात येतो त्या गव्हाणीत टाकली. काही वेळाने कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी बुलेट बाहेर काढली.
आम्ही नोव्हेंबर अखेरपर्यंतचे उसाचे बिल आता शेतकऱ्यांना दिले आहे. लवकरच शेतकऱ्यांना बाकीची रक्कम देण्यात येईल.
- भाऊसाहेब गुंड,संचालक, रूपामाता कारखाना
अत्यल्प पाऊस त्यात मालाला भाव नसल्याने शेतकरी आधीच तणावात आहे. रूपामाता कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी या कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उड्या घेतलेल्या आहेत. येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या कारखान्याचा परवाना रद्द करण्यात यावा.
-अॅड नारायण गोले ,शेकाप नेते