अंबाजोगाई (बीड ) : अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज सहा वर्षे पूर्ण झाली. या हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२०) शहरात अंधश्रद्धा निर्मुलन समिती व समविचारी संघटनेच्यावतीने 'निर्भय मॉर्निंग वॉक'चे आयोजन करण्यात आले होते.
२० ऑगस्ट २०१३ रोजी मॉर्निंग वॉक करत असतानाच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि समविचारी संघटनांच्यावतीने गेली सहा वर्षापासून 'निर्भय मॉर्निंग वॉक'चे आयोजन करण्यात येते. मंगळवारी सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून बसस्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत 'निर्भय मॉर्निंग वॉक' करण्यात आला. येथे अंनिसचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप चव्हाण यांनी 'निर्भय मॉर्निंग वॉक' मागील भूमिका विषद केली. मनोहर जायभाय यांनी निवेदनाचे वाचन केले.
डॉ नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी आणि सूत्रधार सहा वर्षानंतरही दंडीत झालेले नाहीत.मारेकऱ्यांपर्यंत पोलीस पोहंचले असले तरी त्यांच्या विरोधात अद्दापही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी यावेळी सहभागींनी केली. यावेळी अनिस, मानवलोक, मनस्विनी महिला प्रकल्प, अक्षर मानव, माकप, एस एफ आय, ज्येष्ठ नागरिक संघ, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, संवेदनशील मुस्लिम युवक, लायनेस क्लब व महिलांचा मोठा सहभाग होता. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी हेमंत धानोरकर, गणेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.