बाजारपेठेला शिथिलता द्या अन्यथा अत्यावश्यक सेवेसह बाजारपेठ शनिवारपासून बंद -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:35 AM2021-07-30T04:35:36+5:302021-07-30T04:35:36+5:30
आष्टी : शहरातील बाजारपेठेला शिथिलता द्यावी अन्यथा शनिवारपासून शहरातील बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय आष्टी शहर व्यापारी संघटनेने घेतला ...
आष्टी : शहरातील बाजारपेठेला शिथिलता द्यावी अन्यथा शनिवारपासून शहरातील बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय आष्टी शहर व्यापारी संघटनेने घेतला आहे. याबाबत गुरुवारी जिल्हाधिकारी तथा आष्टी तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षापासून कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत गेल्याने आम्ही या देशाचे सजग नागरिक म्हणून देशहितासाठी व आमचे कर्तव्य म्हणून आपण वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे नियमित पालन करत आहोत. व्यापारपेठेतील निर्बंध ज्या ज्या वेळेस वाढविले, त्या त्या वेळेस आम्ही आमच्या नफा तर दूरच परंतु तोट्याचीदेखील पर्वा न करता त्या नियमांचे तंतोतंत पालन केले. परंतु सद्यस्थितीत कोरोना आटोक्यात येत असल्याचे जाणवू लागल्यानंतर राज्य सरकारने निर्बंध हटवण्यास सुरुवात केली. मात्र बीड जिल्हा आणि त्यातल्या त्यात आष्टी तालुक्यातील निर्बंध मात्र हटविण्यापेक्षा ते वाढतच चालल्याचे सद्यस्थितीतील चित्र आहे.
आता व्यापाऱ्यांची सहनशीलता संपत चालली असून व्यापारपेठ रसातळाला जाण्यासारखी स्थिती आताच्या घडीला झालेली आहे. वेळोवेळी आपण व्यापाऱ्यांनाच सध्याच्या परिस्थितीला दोष देणे हे धोरण आता कुठेतरी चुकीच वाटत आहे. कारण एकीकडे आपण व्यापारपेठ बंद ठेवता मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालये सुरू आहेत. आता व्यापारपेठच बंद ठेवा म्हणजे कोरोना नियंत्रणात येईल, असा आदेश काढला. सद्यस्थितीत आता व्यापारी संपूर्णपणे कोलमडला गेला आहे. आधीच दोन वर्षे त्याने हे सर्व सहन केले मात्र आता आपल्या दुकानाचे भाडे, कामगारांचे पगार, स्वतःचा घरखर्च तो आता नाही करू शकत. जितके निर्बंध आणाल रुग्णसंख्येत तितकीच वाढ होत राहणार कारण अल्पवेळेत लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. त्यापेक्षा आता नियम शिथिल करा. जेणेकरून गर्दी आपोआप टाळण्यास मदत होईल. आष्टी शहरातील व्यापारपेठेला शिथीलता द्या अन्यथा शनिवारपासून संपूर्ण बाजारपेठ अत्यावश्यक सेवेसह बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
290721\img-20210729-wa0422_14.jpg